बारामती: बारामती नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी वगळता अन्य सर्व पक्ष एकवटले आहेत. प्रभाग रचना करताना ती सत्ताधार्यांना अनुकुल पद्धतीने केली जावू नये यासाठी त्यांनी आत्तापासूनच लढा सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर विविध 13 पक्ष-संघटनांचे पदाधिकारी रविवारी (दि. 8) गोविंदबागेत खा. शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग रचना अत्यंत कळीची बनत असल्याचे आजवरच्या निवडणूकीच्या निमित्ताने समोर आले आहे. बारामतीपुरतीच ही बाब नाही, तर प्रत्येक ठिकाणी सत्ताधारी आपल्याला अनुकुल ठरतील या प्रमाणे प्रभाग तयार करत असतात. (Latest Pune News)
बारामती नगरपरिषदेची निवडणूक लवकरच जाहीर होईल,त्यासाठीची प्रभाग रचना तयार करण्याची अधिसूचना आता कोणत्याही क्षणी निघण्याची शक्यता आहे.बारामती नगरपरिषदेवर मागील काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्ता होती.
अर्थात त्यावेळी राष्ट्रवादी एकसंघ होती. आता पक्ष फुटला गेला असला तरी बारामतीत अजित पवार यांचेच प्राबल्य आहे,परिणामी प्रभाग रचना करताना ती विरोधकांना प्रतिकूल ठरेल अशी होवू शकते, अशी भिती विरोधकांना आहे.
मागे करण्यात आलेली प्रभागरचना लक्षात घेतली तर ही भिती आहे,त्यामुळेच अधिसूचना जारी होण्यापूर्वीच अजित पवार यांची राष्ट्रवादी वगळता अन्य सर्व पक्ष-संघटना सावध झाल्या आहेत. नुकतीच बारामतीत त्यांनी बैठक घेत यासंबंधी व्यापक लढा देण्याचा निर्धार केला आहे.
प्रभाग रचना करताना नैसर्गिक सीमांचे पालन केले जावे, कायदेशीर व नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर प्रभाग रचना व्हावी,एखाद्या समुदायाचे एखाद्या भागात प्राबल्य असेल तर तो भाग दोन वेगवेगळ्या प्रभागांना जोडू नये आदी मुद्दे बारामतीत या 13 पक्ष-संघटनांनी समोर आणले आहेत.
शिवाय या प्रकरणी नागरिकांमध्ये जनजागृती, विविध प्रभागांमध्ये बैठका व सभा घेणे, पत्रकार परिषदा घेणे, निवेदनाद्वारे प्रशासकीय पातळीवर हरकती नोंदवणे, आवश्यकतेनुसार न्यायालयात याचिका दाखल करणे असा एकसंघपणे लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचसंबंधी ते रविवारी संध्याकाळी 6 वाजता बारामतीत खा. शरद पवार यांची भेट घेणार आहेत.