पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात 11व्या दहशतवाद्याला बेड्या file photo
पुणे

Pune News: पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात 11व्या दहशतवाद्याला बेड्या

तीन लाखांचे होते बक्षीस; बॉम्ब बनविण्याचे देत होता प्रशिक्षण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: इप्रूव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) म्हणजे बॉम्ब बनविण्याचे व गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण देणार्‍या इसिसच्या आणखी एका दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बेड्या ठोकल्या. पुणे मॉड्यूल प्रकरणातील तो एक मुख्य आरोपी असल्याचे व त्याच्याविरुद्ध विशेष एनआयए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते.

त्याच्यावर तीन लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. या दहशतवाद्याच्या अटकेमुळे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. रिझवान अली ऊर्फ अबू सलमा ऊर्फ मौला असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. या गुन्ह्यातील अटक केलेला अकरावा आरोपी ठरला आहे. (Latest Pune News)

तर, या प्रकरणात आत्तापर्यंत मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सीमाब नासिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोदवाला, शामिल नाचन, अकीफ नाचन, शहनवाज आलम, अब्दुल्ला फैयाज शेख, तल्हा खान यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या तपासात उघड झाल्याप्रमाणे रिझवान अली हा इसिसच्या भारतातील कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होता.

वेगवेगळ्या शहरांमध्ये रेकी (गुप्त पाहणी) करून दहशतवाद्यांसाठी सुरक्षित लपण्याची ठिकाणे शोधण्याचे काम त्याच्याकडे होते. तसेच गोळीबाराचे प्रशिक्षण, बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण आणि नवीन सदस्यांना प्रशिक्षण देणे अशा अनेक जबाबदार्‍या त्याने पार पाडल्याचे एनआयने त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. रिझवान आणि याआधी अटक करण्यात आलेले 10 आरोपी मिळून देशात धार्मिक तेढ निर्माण करून दहशत माजवण्याचा कट रचत होते.

आतापर्यंत या प्रकरणात समोर आलेल्या बाबी

  • या प्रकरणाचा 2023 मधील पुण्यात आयईडी (विस्फोटक उपकरण) तयार करून त्याची चाचणी करण्याच्या कटाशी संबंध

  • आरोपींनी पुण्यातील कोंढवा भागातील एका भाड्याच्या घरातून बॉम्ब तयार करण्याचे काम केले

  • सुरुवातीला पुण्यातील कोथरूड येथून तिघांना झाली होती अटक; मोहम्मद आलम झाला होता फरार

  • बंदी घातलेल्या अलसुफा संघटनेशी संबंध

  • फरार दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबर त्यांना आईडी तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन

  • बॉम्बस्फोट केल्यानंतर अटकेपासून बचावासाठी दुर्गम जंगलात ड्रोनद्वारे शोधली होती ठिकाणे

  • भारतातील दहशतवादी कृत्यासाठी त्यांना भारतातून तसेच परदेशातून वित्तपुरवठा

  • महाराष्ट्र, गोवा, तेलंगणासह इतर राज्यांमध्ये इसिसचा प्रसार करण्यासाठी रेकी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT