पुणे: अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी बुधवारी विद्यार्थी आणि पालकांनी सायबर कॅफेसह अन्य ठिकाणी गर्दी केली खरी; परंतु पहिल्याच दिवशी संकेतस्थळच उघडले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील हिरमोड झाला, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने आज (दि. 22) प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेला पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींचे ग्रहण लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
माध्यमिकचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केल्यानुसार, अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीचा विद्यार्थी व पालक यांच्यासाठी सराव करण्यासाठी पोर्टल सुरु करण्यात आले होते. सराव करतेवेळी राज्यातील पालक, विद्यार्थी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व शिक्षणतज्ज्ञ यांच्या अमूल्य सूचना प्राप्त झाल्या आहेत. (Latest Pune News)
सदरील सूचनांचा अंतरभाव ऑनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये करण्यासाठी संबंधित तांत्रिक बदल करणेबाबत सूचित केले आहे. यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार फेरी क्रमांक 1 चे दिनांक 19 मे 2025 ते 13 जून 2025 दरम्यानचे विद्यार्थी नोंदणी, प्राधान्यक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट आदी बाबींच्या दिनांक जाहीर केल्या होत्या.
दिनांक 21 मे 2025 रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळाबाबत तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ योग्य प्रकारे विद्यार्थी नोंदणी व प्राध्यान्यक्रम कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी यापुढे विद्यार्थी हित लक्षात घेता व तांत्रिक बाबींची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, या बाबी लक्षात घेता इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक दिनांक 22 मे दुपारी 3 वाजता फेरी क्रमांक 1 बाबतचे सविस्तर वेळापत्रक घोषित करण्यात येईल.
पोर्टलवर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने होत असले तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदविण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल. प्रवेशाचे पोर्टल परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरुपात उपलब्ध झालेले असेल. कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवेशाचे पोर्टल सुरु होण्याची वेळ ऑनलाईन दर्शविण्यात येईल.
तसेच विद्यार्थ्यांना ई-मेल व मोबाईल संदेशाव्दारे कळविण्यात येईल. त्रुटीसह अर्ज भरण्याचे सुविधा देण्याऐवजी पोर्टल सुलभ व त्रुटीरहित करून सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे व एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोयी-सुविधा, मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरविले जाईल तरी कोणीही गोंधळून जाऊ नये असे देखील डॉ.पालकर यांनी स्पष्ट केले आहे.