

पुणे: राज्यात अवेळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीमुळे 25 जिल्ह्यातील सुमारे 26 हजार 165 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झालेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उन्हाळी हंगामातील पिके, फळे आणि भाजीपाला पिकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसल्याचे कृषी विभागाच्या नजर अंदाजित ताज्या अहवालातून समोर आहे. पावसाची हजेरी कायम राहिल्यास नुकसान क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यताही अधिकार्यांनी वर्तविली.
पिकांच्या झालेल्या नुकसानीमध्ये भात, मका, कांदा, भाजीपाला, बाजरी, ज्वारी, तीळ, उन्हाळी मुग, भुईमूग शेंगेचा समावेश आहे. या शिवाय संत्रा, केळी, जांभूळ, आंबा, चिक्कू, डाळिंब, पपई, मोसंबी आणि भाजीपाला या पिकांच्या समावेश आहे.अवेळीच्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय झालेले पिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये) पुढीलप्रमाणे आहे. (Latest Pune News)
त्यामध्ये पालघर 796, रायगड 17, ठाणे 1, नाशिक 2023, धुळे 645, नंदुरबार 69, अहिल्यानगर 749, पुणे 610, सोलापूर 359, सातारा 14, जळगांव 4396, धाराशीव 68, जालना 1695, परभणी 229, नांदेड 7, बुलढाणा 488, अमरावती 11796, यवतमाळ 247, वाशीम 203, वर्धा 113, नागपूर 42, चंद्रपूर 1038, भंडारा 75, गोंदिया 143 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 342 हेक्टर मिळून एकूण 26 हजार 165 हेक्टरवरील पिके आणि फळबागांना फटका बसला आहे.