पुणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यात अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, विद्यार्थ्यांना 29 आणि 30 ऑगस्टला प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार आज (दि. 30) प्रवेशासाठी शेवटचा दिवस राहणार आहे. दरम्यान, राज्यात प्रवेशासाठी तब्बल 8 लाख 60 हजार 758 जागा अद्यापही रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 535 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 15 हजार 165 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 44 हजार 67 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 59 हजार 232 जागा उपलब्ध आहेत. (Latest Pune News)
त्यासाठी 14 लाख 79 हजार 654 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 32 हजार 369 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1 लाख 66 हजार 105 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 12 लाख 98 हजार 474 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
आता प्रवेशासाठी अद्यापही 6 लाख 82 हजार 796 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 77 हजार 962 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 8 लाख 60 हजार 758 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी सुरू असून संबंधित प्रवेश प्रक्रियेतील शेवटचा दिवस असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात येणार की प्रवेश प्रक्रिया संपल्याचे जाहीर करण्यात येणार हे शनिवारीच स्पष्ट होणार आहे.