पुणे: पुण्यातील वाघोलीमधील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवरील दंडात्मक कारवाईला नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत मान्यता देण्यात आली. चौकशी समितीने केलेल्या शिफारशीनुसार कॉलेजला तीन लाख रुपयांचा दंड, दहा वर्षे कॉलेजचे परीक्षा केंद्र बंद आणि कॉलेजच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना परीक्षेचे काम करण्यास बंदी असा कारवाईचा बडगा उगारत चांगलाच दणका दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात रात्रीच्या अंधारात विद्यार्थ्यांना कॉलेजच्या एका प्राध्यापकाने झालेल्या पेपरच्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. (Latest Pune News)
त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, विद्यापीठाने या प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीमध्ये अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह प्राचार्य डॉ. सुनील ठाकरे, प्राचार्य डॉ. सुनीता आढाव आणि समीर भोसले यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता. चौकशी समितीने कॉलेजला भेट देऊन सर्व बाबींची पाहणी करून विद्यापीठाला अहवाल सादर केला. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने संबंधित अहवाल व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला. त्यावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
परीक्षेसारख्या गोपनीय कामाबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे वाघोलीतील पार्वतीबाई गेनाबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवर दंडात्मक कारवाई केली आहे. याबद्दल विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.
परंतु, केवळ मोझे कॉलेजमध्येच अशा घटना घडतात, असे नाही तर इतरही ठिकाणी यांसारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत गांभीर्याने विचार करून अन्य महाविद्यालयांवर देखील लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.
विद्यापीठाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने विद्यापीठाला सादर केलेला अहवाल परीक्षा विभागातर्फे व्यवस्थापन परिषदेसमोर अवलोकनार्थ सादर करण्यात आला. त्यात केलेल्या शिफारशीनुसार दहा वर्षे परीक्षा केंद्र बंद, तीन लाख रुपये दंड आणि कॉलेज स्टाफला परीक्षेचे काम करण्यास मज्जाव यास व्यवस्थापन परिषदेकडून मान्यता देण्यात आली. व्यवस्थापन परिषदेच्या सूचनेनुसार आता विद्यापीठाच्या संबंधित अधिकार मंडळाकडून पुढील कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.- डॉ. प्रभाकर देसाई, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ