वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील दौंडज (ता. पुरंदर) येथील विद्यालयासमोर कंटेनर व कार यांच्यातील अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला. नरेंद्र नारायण घाडगे (रा. काळज, ता. फलटण) असे त्याचे नाव आहे. तर सचिन नंदकुमार बोराटे, दत्तू खंडू सोनकांबळे (रा. कोळकी ता. फलटण) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 28) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला. वाल्हे पोलिस दुरक्षेत्राने दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर(एमएच 20 सीटी 6820) जेजुरीकडे जात होता. तर कार (एमएच 11 सीडब्ल्यू 8219) जेजुरीकडून येत होती. दौंडजमधील विद्यालयासमोर कंटेनरच्या बाहेर असलेल्या जॉबची जोरदार धडक कारला बसली. त्यात कारचा चालक मृत्युमुखी पडला, तर दोघेजण किरकोळ जखमी झाले.
संबंधित बातम्या :
अपघात एवढा भीषण होता की कारचा वरचा भाग कंटेनरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लोखंडी जॉबला अडकला. कंटेनर तसेच पुढे निघून गेला. दरम्यान, जोरदार आवाजाने स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. वाल्हे पोलिस दुरक्षेत्रातील पोलिस नाईक प्रशांत पवार यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून जेजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दौंडजचे पोलिस पाटील दिनेश जाधव, अक्षय कदम, पांडुरंग गायकवाड, ओमकार गायकवाड, ऋतुराज कदम, अक्षय रोकडे, प्रीतम जाधव आदींनी जखमींना मदत केली. याबाबत कंटेनरचालक अरमन मेहदीसहन खान विरोधात दत्तू खंडू सोनकांबळे यांनी वाल्हे पोलिस दुरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. तपास वाल्हे दुरक्षेत्रातील हवालदार दीपक काशिद करीत आहेत.