Prakash Ambedkar On Municipal Corporation Elections: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे. “कदाचित या शेवटच्या निवडणुका असू शकतात,” असा दावा त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांमध्येही संभ्रम आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महापालिका निवडणुकांमध्ये यावेळी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी परिस्थिती त्यांना दिसत नाही. “क्लिअर कट मेजॉरिटी कुणालाही मिळेल, असे चित्र नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. विविध ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याच्या प्रक्रियेबाबत जनतेत नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, बिनविरोध नगरसेवक ही प्रक्रिया लोकांना आवडलेली नाही. ही नाराजी मतदानावर परिणाम करू शकते, असे संकेत त्यांनी दिले. “हे सगळं मतदानात प्रतिबिंबित होण्याची शक्यता आहे,” असे आंबेडकर म्हणाले.
याचवेळी त्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. “पोलीस खात्यात दबक्या आवाजात काही चर्चा सुरू आहे,” असे सांगत त्यांनी या चर्चेमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरत असल्याचे निरीक्षण मांडले. विशेष म्हणजे, ही चर्चा पोलीस विभागात असल्याने लोक अधिक चिंतेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हा तिसरा घटक फारसा उघडपणे बोलला जात नाही, पण तो अस्तित्वात आहे. त्यामुळेच काही लोक म्हणत आहेत की या कदाचित शेवटच्या निवडणुका असतील,” असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनस्थितीवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर किंवा निकालांवर दिसू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे महापालिका निवडणुकांपूर्वीच राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. त्यांच्या दाव्यांवर विविध पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात आणि याचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.