

सोलापूर : देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. हे संविधान टिकवण्याची जबाबदारी केवळ फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या समूहावरच आहे. सत्ता हे केवळ टेंडर मिळवण्याचे ठिकाण नसून ते विचारांचे केंद्र आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत ते बोलत होते. आंबेडकरांनी सद्यस्थितीतील राजकारणावर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी ही केवळ एका विशिष्ट घटकाची संघटना नसून ती मुसलमान, ख्रिश्चन, लिंगायत, जैन आणि इतर सर्व उपेक्षित समूहांच्या समस्या मांडणारी मोठी शक्ती आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी या सर्व समूहांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या माणसाने सत्तेवर बसणे ही गरज आहे, असेही त्यांनी ठामपणे मांडले. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी नितीन ढेपे, नाथ साळुंखे, नुतन नगरसेवक अरुण आबा जाधव, आतिश बनसोडे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, युवक अध्यक्ष, महेश जाधव, सचिन शिराळकर, नरेंद्र शिंदे ,विक्रांत गायकवाड आदी उपस्थित होते.
ओबीसींना शंकराचार्य पदाचा अधिकार मिळावा
ओबीसी समाजाला हिंदू धर्मात मानाचे स्थान हवे असेल, तर केवळ आरक्षण पुरेसे नाही; त्यांना धार्मिक उच्च पदांवरही हक्क मिळावा. शंकराचार्यांच्या गादीवर ओबीसी संताला बसवावे, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. हे स्थान नाकारले जात असल्यास ओबीसींनी आपला केवळ वापर होत असल्याचे ओळखावे, असा इशाराही त्यांनी दिला.