Nitin Deshmukh Joins BJP: मुंबईतील विधिमंडळ परिसरात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर चर्चेत आलेले नितीन देशमुख आता थेट भाजपमध्ये गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे नितीन देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नितीन देशमुखांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश पार पडला. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी विधिमंडळ परिसरात झालेल्या गदारोळानंतर भाजपकडून नितीन देशमुखांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते. मात्र, आता त्याच भाजपने नितीन देशमुखांना पक्षात घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
विधिमंडळ परिसरात गोपीचंद पडाळकर यांच्या कार्यकर्त्यांशी नितीन देशमुख यांचा वाद झाला होता. या घटनेनंतर भाजपकडून नितीन देशमुखांवर जोरदार टीका करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 124 मध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेला जागा सुटल्यामुळे नितीन देशमुख नाराज होते. ही नाराजीच त्यांच्या पक्ष बदलामागचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक राजकारणात संधी कमी होत असल्याची भावना निर्माण झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
ज्या नितीन देशमुखांवर काही दिवसांपूर्वी भाजप आरोप करत होती, त्याच व्यक्तीला आता पक्षात स्थान दिल्याने भाजपच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) साठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
राजकारणात कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतात, हे पुन्हा एकदा या घटनेतून दिसून आले आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश कोणासाठी फायदेशीर ठरतो, हे येणारा काळच ठरवेल.