

Will provide crores of rupees for temple preservation; Cultural Minister Shelar
निलंगा, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पुरातन मंदिरांचे जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्याचे काम आम्ही प्राधान्याने करीत आहोत. या मंदिरांच्या ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी शेकडो कोटी रुपये लागले तरी सरकार मागे हटणार नाही, निधी दिलाच जाईल, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी (दि.३) येथे दिली ते निलंग्यातील ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर मंदिराच्या जतन आणि संवर्धन कार्याच्या शुभारंभ व महाआरती प्रसंगी बोलत होते.
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक तेजस गर्गे, तांत्रिक सल्लागार तेजस्विनी आफळे, अरविंद पाटील निलंगेकर, राहुल केंद्रे, अजित पाटील कव्हेकर, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंदिराच्या वतीने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा निळकंठेश्वर प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना मंत्री शेलार म्हणाले, निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर हे जगाला हेवा वाटावा असा वास्तुकलेचा ठेवा आहे.
या मंदिरात महादेव, विष्णू आणि पार्वती यांच्या एकत्रित दर्शनाने धार्मिक आणि सांस्कृतिक सौंदर्याची परिपूर्णता दिसून येते. हे व्यासपीठ राजकारणाचे नाही, परंतु राजकीय चर्चा करायची वेळ आलीच तर ती येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या आखाड्यात करू, असे ते म्हणाले.
यावेळी आ. संभाज-ीराव पाटील निलंगेकर यांनी निळकंठेश्वर हे आमचे ग्रामदैवत असून आमच्या कुटुंबाची वडिलोपार्जित सेवा आहे. या मंदिराच्या बाबतीत कोणी राजकारण करू नये. हे काम भावी पिढीसाठी आदर्श ठरेल आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून दिशादर्शक वास्तू म्हणून त्याची जपणूक केली जाईल असे सांगितले. प्रास्ताविक तेजस्विनी आफळे यांनी केले. आभार माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी मानले.