पालघर: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी विश्वासाची ग्वाही गृह (शहरे ) महसूल, ग्रामविकास व पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण , अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी शेतकऱ्यांना दिली.
दुष्काळाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावूनघेतला असताना, त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मंत्री योगेश कदम यांनी मोखाडा तालुक्यातील हट्टीपाडा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी मोखाडा तहसीलदार रोहन शिंदे, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, पोलीस निरीक्षक अजित साबळे, नायब तहसीलदार डॉ.बाळाराम भला तसेच अधिकारी आणि ग्रामस्थ,शेतकरी उपस्थित होते.
मोखाडा तालुक्यातील हट्टीपाडा येथे ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधताना मंत्री योगेश कदम म्हणाले की, या भेटीचे नियोजन करण्यासाठी अवघे २४ तासही मिळाले नव्हते. मात्र, सहकारी आणि पाड्यातील ग्रामस्थांनी अत्यंत मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.
दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेले असतानाही आदिवासी समाजाने आपली समृद्ध संस्कृती जपत पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले. शेतकऱ्यांच्या या आपुलकीबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. “आज तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत साजरी होत असलेली दिवाळी माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची आणि मोठी दिवाळी असल्याची भावना मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली.
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला घरी न थांबता शेतकऱ्यांसोबत सण साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे कदम यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जालना आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळी साजरी करत असल्याचा उल्लेख करत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतकऱ्यांसोबत सण साजरा करण्यासाठी हट्टीपाड्यात आल्याचे मंत्री योगेश कदम म्हणाले.
जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांचे विशेष कौतुक
मंत्री योगेश कदम यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरा करण्याचा निर्णय घेऊन अगदी 24 तासात झाले होते अशावेळी खऱ्या अर्थाने दुर्गम भागात जाऊन आदिवासींसोबत दिवाळी साजरी करावी यासाठी जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण तालुकाप्रमुख अमोल पाटील आणि माजी सभापती प्रदीप वाघ यांनी नियोजन करत ही दिवाळी साजरी केली.