बोईसर ः बोईसर एमआयडीसीत वारंवार होणारे स्फोट,अनेक दुर्घटना यामुळे येथील कमगारांची सुरक्षा वाऱ्यावर पडल्याचे दिसत असून रेमी एडस्थल ट्यूबलर्स लिमिटेड कंपनीत वातानुकूलित यंत्राचा कॉम्प्रेसर स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या दोन्ही कामगारांची प्रकृती अद्याप चिंताजनकच आहे. या अपघातानंतर पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या स्फोटात कामगार मुश्ताक सलमानी (25) आणि आदिक मुजिबीर रहमान खान (21) हे दोघे गंभीररीत्या भाजले होते. त्यांच्यावर बोईसरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले आहे. वातानुकूलित यंत्रांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम कंपनीकडून एका खाजगी एजन्सीकडे सोपवले असून जखमी दोन्ही कामगार हे त्याच एजन्सीमार्फत काम पाहत होते. या संदर्भात बोईसर पोलिसांनी जखमींचे जबाब घेऊन पुढील कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. तारापूर औद्योगिक क्षेत्रात अशा अपघाती घटनांची मालिका सुरूच राहिल्याने सुरक्षा उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान दोनच दिवसांपुर्वी तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका कारखान्याच्या परिसरात उच्चदाब वीजवाहिनीच्या स्पर्शाने तरुण कंत्राटदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा पोकळी पुन्हा एकदा या या वाढत्या दुर्घटनांमधून समोर येत आहे. आवश्यक प्रशिक्षण, प्रमाणित उपकरणे व सुरक्षा धोरणांचे पालन न करणे ही दुर्घटनेची प्रमुख कारणे असल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत.
कामगार संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. औद्योगिक सुरक्षेच्या नावाखाली दाखवली जाणारी कागदी तटबंदी आणि प्रत्यक्षात सुरू असलेला जीवघेणा खेळ, यावर प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. औद्योगिक पट्ट्यात कामगार सुरक्षेला प्रथम प्राधान्य मिळाले नाही, तर अशा दुर्घटना पुन्हा पुन्हा उभ्या राहत राहतील, अशी तीव्र भावना व्यक्त होत आहे.
अपघातांची मालिका वाढली
एमआयडीसी परिसरात गेल्या काही काळात अपघातांची मालिका वाढली आहे. मागील महिन्यातच एका केमिकल कंपनीच्या टँक विरघळल्यामुळे दोन कामगार जखमी झाले होते. त्याआधी, बॉयलर ब्लास्टमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गाजली होती. नियमांचे उल्लंघन व कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे कामगारांच्या जिवाला सतत धोका निर्माण होत आहे.
अलीकडील काही स्फोट
कॅलिक्स केमिकल (सप्टेंबर 2024): तारापूर एमआयडीसीतील या रासायनिक कारखान्यात ड्रायरचा स्फोट झाला, ज्यामुळे पाच कामगार जखमी झाले.
जखारिया लिमिटेड (सप्टेंबर 2021): या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला, ज्यात एका कामगाराचा मृत्यू झाला आणि चारजण जखमी झाले.
विराज कंपनी (ऑगस्ट 2025): बोईसर उड्डाणपुलाजवळील विराज कंपनीत टायरचा स्फोट झाला, ज्यात एका कामगाराचा मृत्यू झाला.
इतर घटना: तारापूर एमआयडीसीमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.