वाडा : इंग्रजी शाळांनी एकीकडे शिक्षण विभागावर कब्जा मिळवला असताना जिल्हा परिषद शाळांची अवस्था मात्र दिवसेंदिवस अधिकच भीषण बनू लागली आहे. गाळे गावातील विद्यार्थ्यांना पहिली ते चौथीसाठी शिक्षक नसल्याने या विद्यार्थ्यांना तीन ते चार किलोमीटर ची जीवघेणी पायपीट करावी लागत होती. या विरोधात आवाज उठवण्यासाठी वाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातच विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा भरवून निषेध व्यक्त केला.
वाडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गाळे या गावात अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची शाळा सुरू होती, मात्र अचानक या शाळेमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाल्याने पालकांनी नाईलाजाने विद्यार्थ्यांना अन्य गावांमध्ये शिक्षणासाठी पाठविले. एकेकाळी डिजिटल व आदर्श शाळा म्हणून नावारूपाला असलेल्या गाळे या शाळेवर जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे अवकळा येऊन अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या नशीबी पायपीट आली. 2025 या शैक्षणिक वर्षापासून शाळेला टाळे होते मात्र दिवाळीदरम्यान इथे एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आली. दिवाळी नंतर लगेच या शिक्षकाची दुसरीकडे बदली केल्याने पालकांनी मात्र संताप व्यक्त केला.
2021 मध्ये या शाळेत जवळपास 50 विद्यार्थ्यांची संख्या होती मात्र शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला होता. हक्काच्या शाळेत पुन्हा शिक्षक नेमण्यात आल्याने जवळपास 20 ते 25 विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला परंतु दिवाळीनंतर पुन्हा शिक्षक गायब झाल्याने पालक हवालदिल झाले. गुरुवारी शिक्षण विभागाच्या कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात आली असून याची दखल घेत तातडीने शिक्षक देण्याचा निर्णय घेतल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शिक्षक व शिक्षण विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो असा संता पालकांनी व्यक्त केला. विद्यार्थी संख्या असल्यास शाळा सुरू ठेवण्यास काही अडचण नाही, तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील आजपासून शाळा सुरू होईल असे आश्वासन गट शिक्षणाधिकारी उमेश सातपुते यांनी दिले.