वाडा : तालुक्यातील उमरोठे गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या पिंजाळ नदीवर बुधवारी पोहण्यासाठी वाडा शहरातून तीन तरुण गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने वाहत्या पाण्यात बुडून यातील दोघांचा मृत्यू झाला असून दोघांचेही मृतदेह शोधण्यात गुरुवारी पोलिसांना यश आले आहे. पोहता येत नाही म्हणून पाण्यात न उतरलेल्या उर्वरित एका तरुणाने घडलेला प्रकार सांगितल्यावर याबाबत शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
विवेकनगर भागातील तीन तरुण सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पिंजाळ नदीच्या तीरावर फिरायला गेले व पोहण्याचा मोह न आवरता आल्याने नदीच्या पात्रात उतरले. दुर्दैवाने यातील मानव राठोड व गितेश पाटील (दोघांचेही वय १६ ) हे दोन तरुण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाल्याची घटना घडली. वाडा शहरातील विवेकनगर भागात ते राहणारे होते. बुधवारी घडलेल्या या घटनेतील बचावलेल्या एका तरुणाने ही घटना उशिरा पोलिसांना सांगितली व यामुळे शोधमोहिमेला वेग आला.
उमरोठे गावातील स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीसाठी शोधमोहीम सुरू केली असता मिळालेल्या काही वस्तूंवरून घटनेची खातरजमा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अंधारात शोधमोहीम थांबवून गुरुवारी पुन्हा तरुणांचा शोध सुरू केला असता सापने गावच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या हाती आला. अन्य तरुणाचा मृतदेह सापडत नसल्याने एनडीआरएफ जवानांची मदत घेण्यात आली व संध्याकाळी दुसरा देखील मृतदेह उमरोठे गावाजवळच पोलिसांच्या हाती लागला.