असंख्य समस्यांच्या गाळात रुतला वाडा शहराच्या विकासाचा गाडा  pudhari photo
पालघर

Wada Nagar Panchayat election : असंख्य समस्यांच्या गाळात रुतला वाडा शहराच्या विकासाचा गाडा

नगरपंचायत निवडणुकीत जनतेच्या माथी आश्वासनांचेच गाजर?

पुढारी वृत्तसेवा

वाडा : मच्छिंद्र आगिवले

वाडा नगरपंचायतीची दुसरी निवडणूक 2 डिसेंबरला होणार असून वाडा शहरवासीय आपले नवीन भविष्य त्यादिवशी निवडणार आहेत. नगरपंचायतीचा एकंदर कार्यभाग बघता नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून नगरपंचायत क्षेत्रात झालेल्या निकृष्ट व बोगस कामांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. जवळपास 4 वर्षे नगरपंचायतीला लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकाऱ्यांच्या काठीने हाकला जाणारा बहुतांश कारभार संशयास्पद असून कंत्राटदारांनी केवळ जनतेच्या पैशातून खिसे भरण्याचे काम केले असा लोकांचा आरोप आहे.

नगरपंचायत स्थापने नंतर शहरातील लोकांना सोईसुविधांची वानवा भासणार नाही असा जनतेचा समज होता मात्र सत्तेतून बनलेले काही कंत्राटदार व नेत्यांचाच या काळात जास्त विकास झाल्याचे जनता सांगते. शहरात काँक्रिट रस्त्यांचे जाळे विणण्यात आले मात्र एखादा अपवाद वगळता एकही प्रभागात धड रस्ता बनविण्यात प्रशासनाला यश आले नाही. पंधरा दिवसांच्या आत अनेक रस्त्यांनी आपला रंग दाखवला असून अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. कोट्यवधींचा निधी यासाठी खर्च करण्यात आला मात्र पडद्यामागून काही माजी नगरसेवकच कंत्राटदार असल्याने कारवाई होणार तरी कशी असा लोकांचा प्रश्न आहे.

नगरपंचायतीच्या शेवटच्या काही वर्षात तर बोगस कामांचा जणू पूर आल्याचे पाहायला मिळाले असून निकृष्ट व अनाठायी उभारलेल्या संरक्षण भिंती, निकृष्ट काँक्रिट रस्ते, 1 वर्षाहून अधिक काळ स्मशानभूमी अभावी लोकांची झालेली कुचंबणा, गटारांची अपूर्ण व निकृष्ट कामे, पथदिव्यांचे रडगाणे, ओपन जिम व गार्डन भूखंडाची वाताहत, कचऱ्याची समस्या, गढूळ व दूषित पाणीपुरवठा अशा असंख्य समस्यांनी जनता त्रस्त आहे. शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला अवैध फेरीवाल्यांचा असलेला विळखा वाडा शहरातील प्रमुख समस्या असून पार्किंग व अतिक्रमण यामुळे होणारी वाहतूककोंडी डोकेदुखी बनली आहे.

नगरपंचायत प्रशासन याबाबत कोणतीही ठोस कारवाई करायला तयार नसून जनता यामुळे हवालदिल झाली आहे. नगरपंचायतीमध्ये सुरुवातीच्या काळात मुख्याधिकारी पदाची जणू संगीत खुर्ची सुरू असल्याने होणाऱ्या विकास कामांवर कुणाचाही अंकुश राहिला नव्हता. नंतरच्या काळात स्थिर प्रशासक नेमण्यात आले मात्र जानेवारी 2022 पासून नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासनावर कुणाचाही अंकुश न राहिल्याने आंधळं दळत आणि कुत्र पीठ खात अशी अवस्था नगरपंचायतीची झाली आहे.

आजही वाडा शहरांमध्ये असंख्य समस्या आ वासून उभ्या आहेत यासाठी केवळ राजकारण न बघता सुशिक्षित व तडफदार नेतृत्व निवडून देणे गरजेचे असून जनता आता काय निर्णय घेते यावर उद्याच्या वाड्याचे भविष्य अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT