

पालघर : हनिफ शेख
जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे. जव्हार मधील भाजपाच्या हेकेखोरीला कंटाळून महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही कडून भाजपला वगळून एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नगराध्यक्षपदावर शिवसेना शिंदे गटाकडून लढले जाऊ शकण्याची परिस्थिती आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ठरले असून जव्हार नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी (शप) चा उमेदवार दिला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक वृत्तांकडून समजली आहे.
यामुळे आता जव्हार नगर परिषदेतील राजकारण ढवळून निघाले आहे. तर जव्हार शहरातील काही मातब्बर नेत्यांकडून अपक्ष लढण्याची देखील तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. पालघर डहाणू नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायतच्या तुलनेने पाहिल्यास जव्हार नगर परिषदेत अत्यंत कमी मतदार असून 9 हजार 347 मतदार येत्या दोन डिसेंबर रोजी आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.
जव्हार शहरात यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शप आणि शिवसेना यांच्यामध्ये तुल्यबळ लढती होत होत्या. त्यामानाने शहरांमध्ये भाजपची ताकद अगदीच नगण्य होती. एवढी की गतवर्षी त्यांचा फक्त एकच नगरसेवक निवडून आला होता. मात्र आता महायुती मध्ये निवडणूक लागण्याच्या आधीच भाजपकडून नगराध्यक्ष पदावर दावा करण्यात आला त्यानुसार प्रचार बॅनर बाजी सुद्धा करण्यात आली. यामुळे महायुतीच्या बोलणी आधीच भाजप पुढे निघून गेल्याने शिवसेना शिंदे गटांमध्ये नाराजी होतीच मात्र आता भाजपच्या या आडमुठे धोरणाच्या विरोधात महायुतीतील तिसरा घटक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भाजप ऐवजी शिवसेना शिंदे गटाशी सलगी झाल्याचे एकूण चित्र दिसून येत आहे.
यामुळे महायुती न झाल्यास भाजपाला वगळून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रितपणे ही निवडणूक लढू शकतील अशी स्थिती आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये प्रगल्भतेचे दर्शन देत एकत्रित शिवसेना असताना शिवसेनेचा नगराध्यक्ष होता. त्यानुसार या पदावर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा केला जाऊ शकणार अशी स्थिती असताना ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चा उमेदवार देण्याचे ठरले आहे.या आधी 2012 मध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असल्याने शहरांमध्ये राष्ट्रवादीची परिस्थिती भक्कम असल्याचे देखील आता बोलले जात आहे. दोन तुल्यबळ पक्ष सध्या फुटलेले असल्यामुळे दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी यामध्येच ही लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
तर दुसरीकडे भाजपाने सत्ताधारी पक्ष म्हणून पालघर लोकसभेतील खासदार, विधानसभेतील आमदार यांच्या बळावर शहरांमध्ये आपली ताकद वाढल्याचा दावा केला आहे.यामुळे महायुतीत नगराध्यक्ष पद आम्हाला मिळावे अशी मागणी भाजपची आहे. बाकी सगळं होईल पण नगराध्यक्ष पदावर शिवसेना शिंदे गटाचा दावा असेल अशी भूमिका शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आल्याने आता महायुती फुटीच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. जव्हार नगर परिषदेत एकूण 20 नगरसेवक आणि एक थेट नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी 4 हजार 894 स्त्री मतदार तर 4 हजार 452 पुरुष मतदार आपले मतदान करणार आहे.
महाविकास आघाडीच ठरले असून आम्ही पालघर आणि वाडा या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देणार आहोत. बाकी डहाणू आणि जव्हार नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे उमेदवार लढणार आहेत.
अनुप पाटील, जिल्हा प्रमुख, पालघर शिवसेना (ठाकरे गट).
निवडणुकांना मध्ये प्रत्यक्ष प्रचार आणि आणि मतदान यासाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे. मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्ष अत्यंत समजूतदारपणे या जागा वाटपाचा निर्णय घेत आहेत. यामुळे जिल्ह्यातील चारही निवडणुकीत नगराध्यक्ष तसेच नगरसेवक बाबत उमेदवारी जवळपास ठरली असून काही नगरसेवकांच्या जागांवर पुन्हा एकदा बसून निर्णय घेतला जाणार आहे. मात्र महाविकास आघाडी अभेद्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकात चांगला स्कोअर आम्ही सर्व मिळून करणार हे निश्चित.
सुनील भुसारा, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शप).