सचिन भोईर
विक्रमगड: आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चव, सुगंध आणि रुचकरपणामुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या वाडा कोलमला यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे.
पावसाने वेळेपूर्वीच पाठ फिरवल्याने वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वाडा कोलमचे तब्बल ७० टक्के उत्पादन वाया गेल्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यंदा बाजारपेठेत वाडा कोलमची आवक घटण्याची शक्यता असून, या वैशिष्ट्यपूर्ण तांदळाची चव चाखण्यासाठी खवय्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वाडा कोलमने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या जोरावर केवळ राज्यातच नव्हे, तर देशाच्या आणि जागतिक बाजारपेठेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे वाडा तालुक्यातील भातशेतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून बदलते हवामान, कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड, यामुळे भातशेतीचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. यंदाही पावसाने सुरुवातीला साथ दिल्यानंतर ऐन भातपिकाच्या वाढीच्या आणि दाणे भरण्याच्या काळात पावसाने दडी मारली.
त्यामुळे पाण्याअभावी भातपिके करपली असून, अनेक शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पादन आलेले नाही. आधीच वाढत्या मजुरीचे दर, रासायनिक खते, कीटकनाशके आणि बियाण्यांच्या वाढत्या किमती यामुळे भातशेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
दुसरीकडे भाताला मिळणारा अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या पावसाच्या अनियमिततेने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.
विशेष म्हणजे, यां वर्षी दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुरेसे भातपीक तयार झालेले नाही. काही ठिकाणी भाताचे उत्पादन अत्यल्प झाले असून, काही शेतकऱ्यांकडे पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवण्याइतकेही धान्य शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे पुढील हंगामात वाडा कोलमच्या लागवडीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाडा कोलम ही केवळ एक भाताची जात नसून, या भागातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी आणि परिसराच्या ओळखीशी जोडलेली आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात झालेली मोठी घट ही केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर वाडा कोलमच्या बाजारपेठेसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत द्यावी, तसेच पुढील हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
चव जगभर पोहोचली; मात्र उत्पादक शेतकरी संकटात!
वाडा कोलमच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे त्याला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र, या चवीमागे राबणाऱ्या शेतकऱ्याला हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च आणि घटते उत्पन्न यांचा सामना करावा लागत आहे. वाडा कोलमची जागतिक स्तरावरील ओळख टिकवायची असेल, तर या पिकाच्या उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून ठोस मदत आणि दीर्घकालीन संरक्षण मिळणे आवश्यक आहे.