‘भात’ हा तमाम मराठी माणसांच्या त्यातही थाळीतील आवडता पदार्थ. त्यात तो सुगंधी असेल तर जेवणाची लज्जत आणखी वाढते. त्यासाठी दैनिक ‘पुढारी’ने महाराष्ट्राच्या विविध प्रदेशात घेतल्या जाणाऱ्या काली मुंछ, इंद्रायणी, वाडा कोलम आणि आंबेमोहोर पिकांचा घेतलेला हा आढावा.
पालघर : हनिफ शेख
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका कृषी परंपरेने समृद्ध मानला जातो. येथील भूमी, हवामान आणि पाण्याची नैसर्गिक गुणवत्ता विविध पिकांसाठी अनुकूल आहे. मात्र, या तालुक्याची खरी ओळख घडवणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमावलेले प्रमुख उत्पादन म्हणजे ‘वाडा कोलम’ भात. अनेक दशकांपासून सुगंधी, नाजूक, हलका व रुचकर हा भात ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. त्याचा सुगंध जणू आसमंतात दरवळतोय.
‘वाडा कोलम’ भाताचा दाणा लहान, स्वच्छ, तुकतुकीत व अतिशय सुगंधी असतो. शिजवल्यानंतर हलका, मोकळा आणि सहज पचणारा असल्याने तो शहरी भागात विशेष लोकप्रिय आहे. लग्नसमारंभ, उत्सव, हॉटेल्स, तसेच घरगुती वापरासाठीही वाडा कोलमची मागणी वर्षांनुवर्षे वाढत आहे. अलीकडच्या वर्षांत मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे यांसारख्या शहरांसह परदेशातही वाडा कोलमला प्रचंड मागणी आहे. काही मिल मालकांनी प्रक्रिया केंद्रे उभारल्यामुळे भाताची गुणवत्ता सुधारली असून बाजारपेठेत ‘वाडा कोलम’ ब्रँडने स्थान पटकावले आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा कोलम तांदळाची चर्चा आता साता समुद्रापल्याड होत आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात जिनी व सुरत या जातीच्या भाताची लागवड केली जाते. येथील जमीन आणि वातावरण पोषक त्यासाठी पोषक आहे. कालांतराने वाढलेल्या मागणीमुळे या जातींना वाडा कोलम असे नाव देण्यात आले. 1910 पासून तांदळाचे कोठार मानल्या जाणाऱ्या वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात जिनी व सुरती या जातीच्या भाताची लागवड केली जात असे. जंगलातील पाण्याची साठवणूक करून, जमिनीची मशागत करून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनेच या वाणांची लागवड शक्य असते.
जीआय मानांकनासाठी प्रयत्न सुरू
वाडा कोलम या तांदळाचा उपयोग भात बनविण्याबरोबरच पेज खिचडी उपमा इडली यासारखे पदार्थ बनविण्यासाठी सुद्धा उत्तम मानला जातो. वाडा कोलम ही ओळख मिळण्या अगोदर या भाताचे स्थानिक नाव जिनी असल्याचे बोलले जात आहे. या ‘वाडा कोलम’ला भौगोलिक मानांकन म्हणजेच (जीआय) मिळावे यासाठी सुद्धा मोठे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्थानिक शेतकरी संघटना, कृषी विज्ञान केंद्र आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांना गती मिळाली आहे. जीआय मानांकन मिळाल्यास वाडा कोलमला जागतिक बाजारपेठेत अधिक ओळख मिळेल.
वाडा कोलम तांदूळ पारंपारिक व सुधारित
कमी शेतात जास्त उत्पन्न मिळत असल्याने काही शेतकरी सुधारित पिकाच्या उत्पादनाकडे वळाल्याचे दिसून येते. सध्या ‘वाडा कोलम’चा बाजार भाव 80 रुपये प्रतिकिलो, तर सुपर वाडा कॉलम 90 रुपये किलोने विकला जातो. पारंपरिक पद्धतीने थेट शेतकऱ्यांकडून असा भात घ्यायचा म्हटला तर त्याची किंमत 100 रुपयांवर सुद्धा जाताना दिसते. दुसरीकडे सरकारी दराप्रमाणे (टरफलासहित) असलेला भात 29 ते 30 रुपयांना खरेदी केला जातो.