विरार : विरार पश्चिम येथील एका लोकप्रिय फ्रँचायझी हॉटेलच्या फूड लायसन्सवर अन्न व औषध प्रशासनाने दणका दिला आहे. हॉटेलमधील डेझर्ट केकमध्ये झुरळ आढळल्याची तक्रार ग्राहकाने केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन, पालघर विभागाकडून हॉटेलची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर हॉटेलचे फूड लायसन्स निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
संबधित ठिकाणी एका ग्राहकाला देण्यात येणाऱ्या डेझर्ट केकमध्ये झुरळ आढळून आले होते. या प्रकारामुळे ग्राहकाला मोठा धक्का बसला. त्यानंतर संबंधित ग्राहकाने या प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे केली. तक्रारीची दखल घेत FDA पालघरच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलची तपासणी केली.
दरम्यान, संबंधित ग्राहकाने हॉटेलमधील अस्वच्छतेचे काही व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले होते. या व्हिडिओमध्ये हॉटेलच्या काही भागात अस्वच्छता असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर तक्रार समोर आल्यानंतर प्रशासनाने नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पाहणी केली. तपासणीदरम्यान त्रुटी आणि अस्वच्छतेच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर संबंधित हॉटेलविरोधात कारवाई केली आहे.