विरारमध्ये कालबाह्य कच्चामाल, मिठाईचा लाखोंचा साठा जप्त pudhari photo
पालघर

Virar expired food seizure : विरारमध्ये कालबाह्य कच्चामाल, मिठाईचा लाखोंचा साठा जप्त

वसई-विरारमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा : वसई-विरार परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विरार पश्चिमेतील एका परिसरात असलेल्या एका मिठाईच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा कालबाह्य (एक्सपायर्ड) कच्चा माल व तयार मिठाई जप्त केली आहे.

नुकत्याच झालेल्या या छापेमारीत अधिकाऱ्यांनी दुकान आणि संबंधित गोदामाची तपासणी केली. तपासादरम्यान बेसन, पीठ, खमण यांसारख्या मिठाई तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची मुदत संपलेली असल्याचे आढळून आले.

गंभीर बाब म्हणजे, हेच साहित्य वापरून मिठाई तयार करून ग्राहकांना विकली जात होती. तज्ज्ञांच्या मते, कालबाह्य अन्नपदार्थांचे सेवन केल्याने फूड पॉइझनिंग, ऍलर्जी तसेच इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे हा प्रकार केवळ नियमभंग नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अग्रवाल लाइफस्टाइल परिसरात मोठ्या प्रमाणावर कुटुंबे राहत असल्यामुळे या निष्काळजीपणामुळे सार्वजनिक आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला सर्व एक्सपायर्ड माल वसई येथे नेऊन नष्ट करण्यात आला, जेणेकरून त्याचा पुन्हा वापर होऊ नये.

या मोहिमेत पालघर अन्न व औषध विभागाचे अधिकारी वी. चौहान, उमेश कावले आणि श्रीम शिरसाट सहभागी होते. अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे. दरम्यान, नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा करण्याची तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.कालबाह्य औषधांनंतर आता मिठाईचा साठा उघड झाल्याने वसई-विरारमध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT