

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. परराज्यातून आलेले बोगस डॉक्टर ठाणेकरांच्या जीवाशी खेळत आहे, असा गंभीर आरोप माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी बुधवारी झालेल्या महासभेत केला. त्यानंतर प्रभाग समिती निहाय पथके नेमून सर्व दवाखान्यांची तपासणी करून कारवाईचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून सभागृहाला देण्यात आली.
ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मानद डॉक्टर घेण्याबाबतचा विषय सभेत मंजुरीला आला होता. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी मानद डॉक्टरांच्या पॅनलसह आयव्हीएफ, सोनोग्राफी सेंटर याबाबत प्रश्न उपस्थित केला.
त्यावेळी प्रशासनाकडून मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि रेडियोलॉजिस्ट यांना देण्यात येणाऱ्या मानधन आदी संपूर्ण माहिती दिली. तसेच ठाणे महापालिका क्षेत्रात 11 आयव्हीएफ सेंटर आहेत. तर 27 आयव्हीएफ केंद्र मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती सभागृहात दिली. त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेच्या हद्दीत 2 मार्चपासून आयव्हीएफ केंद्राची 6 पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे.
तसेच महापालिका क्षेत्रातील 259 सोनोग्राफी सेंटरला 10 पथकांमार्फत अचानक भेटी देत तपासणी केली असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक रमाकांत मढवी यांनी बोगस डॉक्टरांचा मुद्दा उपस्थित केला. इतर राज्यातून अनेक डॉक्टर पदवी घेऊ न ठाण्यात येतात. दवाखाने सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करतात कारण त्यांच्याकडे विहिद पदवी नसताना उपचार करत असल्याचा गंभीर आरोप केला.
दिवा शहरात अनेक नवनवीन दवाखाने सुरू असल्याचे सांगत, बोगस डॉक्टरांवरील काय कारवाई करण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी क्लिनिकल इस्टाब्लिश ॲक्ट आपल्याकडे लागू नसल्याची माहिती महासभेत बोलताना दिली.
परिणामी डॉक्टरांना ठाणे मनपाकडे नोंदणीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. त्यावर नगरसेवक आक्रमक होत, बोगस डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार आल्याचा आरोप प्रशासनावर करण्यात आला असून यावरून प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी प्रशासनाची बाजू मांडत, प्रभाग समिती निहाय डॉक्टरांचे पथक नेमण्यात येईल. या पथकाच्या माध्यमातून क्लिनिक व दवाखान्यांची तपासणी करण्यात येईल. या कारवाईत दोषी आढळून येणाऱ्या बोगस डॉक्टरांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या कारवाईचा अहवाल तयार करण्यात येईल, अशी माहिती सभागृहाला दिली.