सफाळे : विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरण प्रकल्पाच्या रखडलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी आता स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे “चौपदरीकरण कधीही पूर्ण करा; पण सध्याच्या घडीला डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवा आणि 15 डब्यांच्या लोकल सुरू करा.”
2016 साली सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम पाच वर्षांत पूर्ण होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 2021-22 पर्यंत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र भूमीअधिग्रहण, कांदळवन तोडणी मंजुरीतील विलंब आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे 2026 साल उजाडले तरी प्रकल्प अपूर्णच आहे. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने अनेक वेळा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन कार्यालयात भेटी देऊन निवेदने सादर करण्यात आली. तसेच माहितीच्या अधिकारातून प्रकल्पाच्या पूर्णत्वाबाबत माहिती मागवण्यात आली. मात्र प्रत्येक वेळी पूर्णत्वाच्या वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या 2022, 2023, 2024 अशा पुढे ढकलल्या गेलेल्या तारखांनंतर अलीकडे मार्च 2027 आणि जून 2027 अशा दोन भिन्न तारखा देण्यात आल्या.
त्यातच काही वृत्तांनुसार मार्च 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित कालमर्यादेबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. ने जाहीर केल्याप्रमाणे सध्या केवळ 47 टक्के काम पूर्ण झाले आहे. म्हणजेच 2016 ते 2026 या दहा वर्षांत अर्ध्याहून कमी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 53 टक्के काम पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पालघर स्थानकाच्या चौपदरीकरणांतर्गत अपेक्षित कामाला सुरुवात झालेली नाही. बोईसर स्थानकाची जुनी इमारत अद्याप तशीच आहे. वाणगाव स्थानकावरील काम संथ गतीने सुरू असून डहाणू स्थानकाच्या पश्चिमेकडील लोकल टर्मिनलचे बांधकामही सुरू झालेले नाही, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांसह पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांना निवेदन देऊन डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे.
तसेच वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता 15 डब्यांच्या डहाणू लोकल तातडीने सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. “चौपदरीकरण प्रकल्पाचा कालावधी सतत लांबत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष घालून डहाणूकर प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल फेऱ्या वाढविणे आणि 15 डब्यांच्या गाड्या सुरू करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा. त्यामुळे प्रवाशांचा विश्वास टिकून राहील.” सध्या हजारो प्रवासी दररोज होणाऱ्या विलंबामुळे त्रस्त असून, तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे.दयानंद पाटील, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, सचिव