नालासोपारा: भिशीत पैसे गुंतवा असे सांगून तब्बल 1 कोटी 31 लाख रूपये घेतले आणि व्याजासह पैसे परत केले नसल्याने याबाबतचा फसवणूकीचा गुन्हा विरार येथे दाखल झाला आहे.
या पुर्वी पतसंस्था आणि नॉन बँकीग संस्थानी दामदुप्पट रक्कम परत करण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे घडत असताना विरारमध्ये भिशीच्या नावाखाली फसवणुकीचा नवा प्रकार उघड झाला आहे.
या प्रकरणात चौघांनी फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदा भिशी चालवल्याचा प्रकार उघड झाल्याने अशा अनेक ठिकाणी चालणारी भिशीची प्रकरणेही चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
विरार पूर्व येथे भिशी व फंडमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 31 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भावना कोळी, हर्ष कमलकार, महेंद्र कोळी व नेहा जाधव यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी व साक्षीदार यांना भिशी व फंडमध्ये 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 9 महिने तसेच 1 वर्षासाठी रक्कम गुंतवल्यास व्याजाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी आरोपींकडे वेळोवेळी एकूण 1,31,40,000 रुपये गुंतवले. मात्र ठरलेला परतावा न देता आरोपींनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ करत आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.