सचिन भोईर
विक्रमगड: विक्रमगड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
यात प्रामुख्याने गवार या भाजीपाला पिकाला शेतकऱ्यांकडून पसंती दिली जात आहे. कमी कालावधीत उत्पादन, तुलनेने कमी पाण्याची गरज आणि बाजारपेठेत असलेली मागणी यामुळे गवार हे विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे.
विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पारंपरिक भातशेती केली जाते. मात्र भातशेतीतून मिळणारे उत्पन्न, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि हवामानातील बदल यामुळे शेतकरी आता पर्यायी पिकांचा विचार करू लागले आहेत. भातशेतीनंतर उपलब्ध होणाऱ्या जमिनीत गवार लागवड करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विशेष म्हणजे तालुक्यातील हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत गवारीचे पीक चांगले येत असल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. गवारीच्या शेंगांना वाशी, मुंबई, ठाणे, वसई, विरार, भिवंडी, कल्याण यांसारख्या शहरांतील भाजीपाला बाजारपेठांमध्ये मागणी आहे.
त्याचबरोबर गुजरात राज्यातील बाजारपेठेतही विक्रमगडमधील गवारीला मागणी मिळत असल्याने शेतकऱ्यांना परराज्यातील बाजारपेठेची संधी उपलब्ध होत आहे. यापूर्वीही गवारीला चांगला बाजारभाव मिळाल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून आले आहे.
गवार लागवडीचे क्षेत्र वाढत असताना उत्पादित मालाला योग्य भाव मिळणे आणि शेतमालाची विक्री सुलभ होणे आवश्यक आहे. विक्रमगड तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजारपेठेचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना वाडा, वसई, विरार तसेच मुंबईसारख्या बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागते. वाहतूक खर्च आणि मध्यस्थांमुळे शेतकऱ्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.
पारंपरिक भातशेतीला पर्याय म्हणून भाजीपाला उत्पादनाकडे वळणारे शेतकरी आणि त्यात गवार लागवडीला मिळणारी पसंती पाहता विक्रमगड तालुक्यात शेतीच्या पीकपद्धतीत बदल होत असल्याचे चित्र आहे. योग्य बाजारपेठ, हमीदार विक्री व्यवस्था आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळाल्यास गवार लागवड आदिवासी शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा चांगला पर्याय ठरू शकते.