Palghar News Pudhari
पालघर

Palghar News: इशाऱ्याकडे दुर्लक्ष अन् अंगणवाडी कोसळली

पारसपाड्यात मोठा अनर्थ टळला, चार महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायतीचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कासा: विक्रमगड तालुक्यातील तलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील पारसपाडा येथील जीर्ण अंगणवाडीची इमारत रविवारी मध्यरात्री कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने अंगणवाडीत कोणीही उपस्थित नव्हते.

त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, चार महिन्यांपूर्वीच ग्रामपंचायतीने संबंधित विभागाला इमारत धोकादायक असल्याचा लेखी इशारा दिला असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

तलवाडा ग्रामपंचायतीने ६ मार्च २०२६ रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) यांना लेखी पत्र देऊन पारसपाडा येथील अंगणवाडीची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

या पत्रात अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच सहा वर्षांखालील बालकांच्या जीवितास धोका असल्याचे नमूद करत तातडीने नवीन इमारत उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, महिला व बाल विकास विभाग तसेच संबंधित बांधकाम विभागाने या गंभीर इशाऱ्याची दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मनसेचे विक्रमगड तालुका उपाध्यक्ष रघुवीर भोगाडे यांनी सांगितले की, धोकादायक इमारतीबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. अखेर अंगणवाडीची इमारत कोसळली. ही दुर्घटना रात्री घडल्याने बालके व कर्मचारी बचावले; मात्र दिवसाच्या वेळेत ही घटना घडली असती, तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर संबंधित बांधकाम विभाग, महिला व बाल विकास विभागातील अधिकारी तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत असून सर्व संबधीत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

चार महिन्यांपूर्वीच दिला होता धोक्याचा इशारा

तलवाडा ग्रामपंचायतीने ६ मार्च २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे पारसपाडा येथील अंगणवाडीची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिली होती. नव्या इमारतीची तातडीने उभारणी करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, संबंधित विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर इमारत कोसळली. त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतीने वेळेवर लेखी अहवाल दिला. आम्हीही संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि अखेर अंगणवाडी कोसळली. ही घटना रात्री घडल्याने मुलांचे जीव वाचले. या निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
- रघुवीर भोगाडे, तालुका उपाध्यक्ष, मनसे (विक्रमगड).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT