Thane News: 'वांगचूक'च्या समर्थनार्थ जिल्हाभर एल्गार; ठाणे, अंबरनाथ, मिरा-भाईंदर, भिवंडीत निदर्शने

डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा केंद्रावर हल्लाबोल
Thane News
Thane NewsPudhari
Published on
Updated on

ठाणे: पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा आणि दिल्लीतील आंदोलन दडपण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी ठाणे, मिरा-भाईंदर, अंबरनाथ आणि भिवंडी येथे आंदोलनांची लाट उसळली.

विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते आणि हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने ठिकठिकाणी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले.

दिल्लीत सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करणे, संसदेकडे निघालेल्या मोर्चावर लाठीमार करणे आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Thane News
Raigad British Era Inscription: अलिबागमध्ये १८५ वर्षांपूर्वीच्या 'बारव' रचनेचा इतिहास उलगडला

यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, १९७३ मध्ये बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सत्तांतर घडवले. विद्यार्थ्यांवर दडपशाही करू नका. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हेही विद्यार्थीच होते. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली तर ती कोणालाही रोखता येणार नाही, असा इशारा दिला.

आज देशभरातील विद्यार्थी स्वतःहून रस्त्यावर उतरले असून, ही चळवळ कोणत्याही राजकीय पक्षाची नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी, गेल्या काही दिवसांत विद्यार्थी स्वतःहून आंदोलनात सहभागी होत आहेत.

अन्यायाविरोधात आता तरुणाई गप्प बसणार नाही, हे आजच्या आंदोलनाने सिद्ध केले, असे सांगितले. या आंदोलनात यासीन कुरेशी, मनिषा भगत, अभिजित पवार, पल्लवी जगताप, शमीम खान, राजेश कदम, राजेश साटम, फुलबानो पटेल, मकसूद खान, मिलींद बनकर, महेश भाग्यवान, समीर पाटील, एकनाथ जाधव, अविनाश अंधारे, साहिल उदगुडे, अंकुश मढवी, मनिषा पटील, शशिकला पुजारी, माधुरी सोनार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

१) मिरारोड रेल्वे स्थानकाबाहेर काँग्रेस, मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने संयुक्त आंदोलन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नीट आणि सीयूईटी परीक्षांतील कथित गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनात राकेश राजपुरोहित, तारेन मेंडोंन्सा, ॲड. सना देशमुख, सिद्धेश मोरे, सचिन पोपळे, रॉबर्ट डिसोझा आदी सहभागी झाले.

२) अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अविनाश देशमुख यांनी, दोन दिवसांत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी काशिनाथ पाटील, भूषण देशमुख, सलीम खान, कैलाशी केंद्रे, मनीषा पोळ, राजाराम खरात, अशोक गजरमल उपस्थित होते.

Thane News
Raigad Heavy Rain: रायगडात पावसाचे दमदार पुनरागमन; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

३) भिवंडीत भर पावसात युवक-युवती मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर उतरले. आर्यन गोसावी यांनी हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी असल्याचे सांगितले. याशिवाय आरपीआय (सेक्युलर) ने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले, तर ॲड. अमोल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली युवा वकिलांनी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना निवेदन दिले. सायंकाळी काँग्रेसचे पंकज गायकवाड यांनीही निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.

ठाणे-पालघरमध्ये आंदोलनाची ठिणगी, राज्यभर एल्गाराचे संकेत

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाणे, मिरा-भाईंदर, अंबरनाथ आणि भिवंडी येथे विद्यार्थी, सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष, वकील आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. नीट आणि सीयूईटी परीक्षांतील कथित गैरव्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि आंदोलनावरील दडपशाही या मुद्द्यांवर केंद्र सरकारविरोधातील रोष अधिक तीव्र होत असल्याचे या आंदोलनांमधून दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news