

पालघर: स्थानिक गुन्हे शाखा आणि मनोर पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर गोमांस तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून दीड टन गोमांसासह तस्करीसाठी वापरलेले वाहन जप्त केले आहे.
पाठलाग सुरु असताना पोलिसांना चकवा देत मनोर मधील गायकवाड डोंगरी परिसरात वाहन सोडून आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले गोमांसाचे नमुने तपासणीसाठी पशु वैद्यकीय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे गोमांस तस्करांचे धाबे दनाणले आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि मनोर पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचला होता. सोमवारी पहाटेच्या सुमारास महामार्गावर संशयास्पद एक इनोव्हा कार आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला.
काही अंतरापर्यंत झालेल्या थरारक पाठलागानंतर गायकवाड डोंगरी परिसरात चालकाने वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळून आले. वाहन आणि गोमांस जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, कारमध्ये गोमांस असल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाहनाच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या गोमांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या प्रकरणातील फरार चालकासह गोमांस तस्करी करणाऱ्या टोळीतील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. एलसीबी आणि मनोर पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमुळे परिसरातील अवैध तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.