Ranagaon bridge pudhari photo
पालघर

Vasai wooden bridge : समाजमाध्यमांमुळे रानगावच्या जुन्या लाकडी पुलाला प्रसिद्धी

पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे वारसा आणि पर्यावरण धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : वसई पश्चिमेतील रानगावचा सुमारे ४० वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी उभारलेला पारंपरिक लाकडी पूल सध्या सोशल मीडियामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मात्र वाढत्या पर्यटनासोबत हुल्लडबाजी, प्लास्टिक कचरा, दुचाकींची वर्दळ आणि रात्रीचा गोंधळ यामुळे वाडवडिलांचा वारसा असलेल्या या पुलासह परिसरातील पर्यावरण धोक्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी शिस्त पाळण्याची आणि प्रशासनाने संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

गोव्यासारखे निसर्गसौंदर्य लाभलेल्या रानगावात समुद्रकिनारा, खाडी, दलदलीचा परिसर आणि सुपीक शेती आहे. पूर्वी येथील लांबट गोड कलिंगड, सफेद कांदा तसेच नारळ, सुपारी, केळी आदी पिके प्रसिद्ध होती. काळाच्या ओघात शेतीची जागा फार्महाऊस, रिसॉर्ट आणि बांधकामांनी घेतली असली तरी गावाचा निसर्ग अजूनही पर्यटकांना आकर्षित करतो.

सुमारे चार दशकांपूर्वी गावातील मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खाडीवर हा लाकडी पूल उभारण्यात आला होता. त्यावेळी समुद्रकिनारा आणि शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी होडीचा वापर करावा लागत असे. पूल उभारल्यानंतर ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली. हा पूल पर्यटनासाठी नव्हे, तर गावाच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग म्हणून उभारण्यात आला होता.

इन्स्टाग्रामवरील पोस्ट आणि स्टोरीमधून या पुलाची माहिती व्हायरल झाल्यानंतर त्याचे अचूक स्थान गुगल मॅपवर उपलब्ध झाले. त्यानंतर छायाचित्रण आणि विरंगुळ्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येऊ लागले. मात्र काही पर्यटकांकडून प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन आणि इतर कचरा परिसरात टाकला जात असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काहीजण जुन्या लाकडी पुलावरून दुचाकी चालवतात. त्यामुळे आधीच जुना झालेला पूल अधिक नाजूक होत असून भविष्यात दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.

श्रमसंस्कृतीचा जिवंत वारसा

रानगावचा हा लाकडी पूल केवळ पर्यटनस्थळ नसून ग्रामस्थांच्या इतिहासाचा आणि श्रमसंस्कृतीचा जिवंत वारसा आहे. त्यामुळे या पुलाचे संवर्धन, परिसरात स्वच्छतेची व्यवस्था, दुचाकींना बंदी, इशारा फलक आणि आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT