

पालघरः दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अति मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. जिल्ह्यातील डहाणू, तलासरी पालघर आदी ठिकाणी पावसाने रौद्ररूप धारण केले असून अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग सहा तास ठप्प होता. संततधार पावसाने जिल्ह्याला सर्तकतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे पाच दरवाजे 75 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास धरणातून एकूण 37,303 क्युसेक पाण्याचा सूर्या नदीत विसर्ग सुरू आहे. धामणी धरणातील पाणीसाठा 93 टक्क्यांवर पोहोचला असून त्याचे उपधरण असलेले कवडास धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सूर्या नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीकाठच्या तब्बल 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तलासरी तालुक्यात गेल्या चोवीस तासात ५८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून सततधार पावसामुळे स्थानिक नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी सखल भागातील पूल पाण्याखाली गेल्याने तालुक्या अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांचा मुख्य बाजारपेठ आणि शहराशी संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वैतरणा, सूर्या, देहरजा आणि वांद्री आदी प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराच्या पाण्याखाली गेल्याने पालघर सिन्नर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.नागझरी गावाच्या हद्दीत सूर्या नदीच्या पाण्याच्या पुराच्या पाण्यामुळे दोन जण झाडावर अडकून पडले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी स्थानिकांकडून बचावकार्य सुरू आहे.
अनेक ठिकाणी मोठी झाडे कोसळल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात विजपुरवठा खंडित झाला आहे. चोवीस तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित असल्यामुळे विजेअभावी मोबाईल नेटवर्क वर परिणाम झाला आहे.
मुसळधार पाऊस आणि कुर्झे धरणाचे पाणी वारोली नदीला सोडल्याने नदीकाठच्या वडोली, सवणे, झरी, गिरगाव आणि गीभानिया गावातील शेकडो घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर काळू (दरोठा) नदीला पूर आल्याने कोचाई येथील पारसपाडा, वाडीपाडा, जुनावार पाड्यातील सुमारे ४० ते ५० घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. कोचाई वाडीपाडा येतली साळकर कुटुंबीय रात्री पुराच्या पाण्याने घरात अडकले होते त्यांना ग्रामस्थानी दोरीच्या सह्नायाने सुखरूप सुटका केली.
पावसाचा जोर एवढा प्रचंड होता की, तलासरी शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारे छोटे-मोठे पूल आणि रस्ते जलमय झाले आहेत. तलासरी उंबराग रस्तावर स्मशान भूमी जवळील पूल आणि झरी खाडी येथे नुकताच उभारण्यात आलेल्या पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक थांबवली आहे. हा रस्ता बारा तासांच्या वर बंद होता. तर कोचाई येथे नदीला पूर आल्याने कोचाई वाडीपाडा येथील मोठा पूल आणि पाड्याला जोडणारा लहान पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटल्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
मुसळधार पावसामुळे अत्यावश्यक सेवा पुरवतानाही प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तलासरी तालुक्यातील नदीकाठच्या गावात शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांच्या घरात पाणी शिरले. घरातील अन्नधान्य, कपडे, आणि घरगुती साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
अनेक जनावरांचे गोठेही पाण्याखाली आले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन करीत पुढील चोवीस तासांत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. रात्रीपासून सुरू झालेल्या सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, सगळीकडे पाणी, वादळ, वा-यामुळे जव्हार ते डहाणू पालघर गरदवाडी घाटात मुख्य रस्त्यावर दरड कोसळी होती. रस्त्यावर झाडे, दगड, माती पडल्यामुळे काही तास वाहतूकीस अडथळा बंद होऊन संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती.
जव्हार शहराला जोडणारे सर्व रस्ते डोंगर दरीतून वाहतूक रस्ते असल्यामुळे ठीक ठिकाणी रस्त्यावर झाडे, दगड, माती भराव पडून रस्ते ठप्प झाले आहेत. मुसळधार सततच्या पावसामुळे सर परिसर जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर दगड, माती, झाडे पडून रस्ते बंद झाले आहेत. त्यातच रस्त्यावर सर्वत्र धुकेची चादर पसरली होती पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव पूर आलेल्या पुलांवरून किंवा नाल्यांवरून प्रवास करू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत झाडे आणि विजेचे खांब पडल्याने मागील १६ तासांपासून शेकडो गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. क्रमगडमध्ये पाचपाड पुलावर पाणी असल्याने मनोर-नाशिक मार्ग बंद झाला आहे. जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
अंधेरीहून आलेले NDRF चे पथक तलासरी येथे दाखल वसई-विरार महानगरपालिकेचे बचाव पथकही सहभागी झाले असून चारोटी परिसरातही बचाव व मदतकार्य सुरू आहे. नागरिकांनी अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी केले आहे.