वसई : वसई विरारचे नवनरिवाचित महापौर आता ॲक्शन मोडवर आले असून, त्यांनी शहर विकासाच्या दृष्टीने आपली पाऊले टाकावया सुरुवात केली आहे. अनधिकृत बांधकामांना यापुढे थारा मिळणार नाही आणि शहराच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या गोष्टींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराच पाटील यांनी दिला असून शहरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आपण सुंदर आणि सुरक्षित वसई-विरारच्या बांधणीसाठी प्रामाणिक प्रयत्न आतून आपले योगदान देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
महानगरपालिकेच्या मुख्यालयात महापौर अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प, रखडलेली विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत महापौरांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी शहरवासीयांना दिलेली विकासकामांची वचने प्रत्यक्षात आणण्यासाठी या बैठकीत सविस्तर विचारविनिमय झाला.
शहरात आकारास येत असलेल्या दिव्यांग व संविधान पार्क या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांच्या कामाची गती महापौरांनी तपासली. नारिंगी-पापडखिंड येथील प्रस्तावित बर्ड पार्कच्या मार्गातील वनविभागाच्या परवानग्या आणि इतर तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देशही दिले. जीवदानी मंदिर पायथ्याशी असलेले क्रिकेट मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याशी हितेंद्र ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करण्यात आली.
या बैठकीला उपमहापौर मार्शल लोपीस, नगरसेवक प्रवीण शेट्टी, प्रफुल्ल साने, आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व दीपक सावंत यांच्यासह सर्व विभागांचे उपायुक्त आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापौरांनी आस्थेटिक इम्प्रव्हमेंट स्कीम राबवण्यावर भर दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानक परिसरातील शंभर मीटरचा भाग फेरीवालामुक्त व मोकळा करण्याबाबात त्यांच्या कडक सूचना आहेत. यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, रिक्षाचालक, फेरीवाले आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे महापौर पाटील यांनी केले.