विरार ः चेतन इंगळे
वसई-विरार महानगरपालिकेला स्थापन होऊन दहा वर्षांहून अधिक काळ उलटला. परंतु या काळात शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रत्येक पावसाळ्यानंतर खड्ड्यांनी व्यापलेले रस्ते नागरिकांच्या जीवावर बेततात, तरीही महापालिकेकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. रस्त्यावरून प्रवास करणे हे आता शहरातील प्रत्येक नागरिकासाठी धोक्याचे ठरत आहे.
खड्ड्यांमुळे होणार्या अपघातांची परिस्थिती धक्कादायक आहे. 2022 साली मिराभाईंदर वसईविरार (एमबीविवी) पोलीस आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार अपघातांमधील मृतांची संख्या 22 होती. पण 2023 साली ती थेट 98 वर पोहोचली. म्हणजे एका वर्षात तब्बल चारपट वाढ. आणखी धक्कादायक म्हणजे जानेवारी ते जुलै 2023 या सात महिन्यांतच 82 जणांचा मृत्यू झाला, तर 131 नागरिक गंभीर जखमी झाले. ही आकडेवारी प्रशासनाच्या निष्क्रियतेवरच बोट ठेवते. 2024 सालीही खड्ड्यांचा कहर थांबला नाही.
अनेक ठिकाणी अपघातांची पुनरावृत्ती झाली. विरारमधील एका 57 वर्षीय शिक्षिकेचा दुचाकी खड्ड्यात अडकल्याने तोल जाऊन मृत्यू झाला. अशा घटना केवळ एका घराचे दुःख नसून संपूर्ण शहरासाठी धोक्याची घंटा आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार न करणे ही महापालिकेची सर्वात मोठी बेफिकीरी ठरते. या अपघातांमुळे कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले, तर काहींनी कुटुंबातील कर्ता पुरुष गमावला. “आकडेवारी ही फक्त संख्या नाही, तर प्रत्येकामागे एक कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे” अशी खंत नागरिक व्यक्त करतात. सकाळी घराबाहेर पडणारा व्यक्ती परत सुरक्षित घरी येईल की नाही, ही भीती आता सर्वसामान्यांच्या मनात घर करून बसली आहे.
महापालिकेच्या बजेटमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपये रस्ते दुरुस्तीकरिता तरतूद केली जाते. पण प्रत्यक्षात रस्ते सुधारले जात नाहीत. केवळ तात्पुरत्या डागडुजीवर पैसा खर्च होतो. काही दिवसांतच हे डांबरी थर निघून पुन्हा तेच खड्डे समोर येतात. या भ्रष्टाचारावर आणि निधीच्या अपुर्या वापरावर नागरिक आक्रमक होत आहेत.रस्त्यांच्या दुर्दशेमुळे केवळ अपघातच नव्हे, तर आरोग्याचे प्रश्नही गंभीर होत आहेत. धुळीमुळे श्वसनाचे आजार, दम्याचे त्रास आणि त्वचेचे विकार वाढले आहेत. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
औद्योगिक वस्त्यांमधून येणारी धूळ आणि अवजड वाहनांचा प्रचंड भार रस्त्यांच्या हानीस कारणीभूत ठरत आहे.या गंभीर परिस्थितीत नागरिकांचा संताप प्रचंड वाढला आहे. आंदोलनांची हाक दिली जात आहे, सामाजिक संघटनाही रस्त्यावर उतरत आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावून निषेध नोंदवला आहे. परंतु तरीही महानगरपालिकेच्या अधिकार्यांची भूमिका ही केवळ आश्वासनापुरतीच मर्यादित दिसून येते.
वसईविरार हे शहर जलदगतीने विकसित होत आहे, लोकसंख्या वाढत आहे. पण पायाभूत सुविधांच्या बाबतीत अजूनही हे शहर मागे आहे. रस्त्यांची स्थिती सुधारली नाही तर “खड्ड्यांचे शहर” ही ओळख वसईविरारच्या कपाळावर कायमची उमटेल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.आजचा प्रश्न केवळ पायाभूत सुविधांचा नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेचा आहे. खड्डेमुक्त रस्ते हा चैनीचा विषय नाही, तर प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. महापालिकेने या दिशेने तातडीने कार्यवाही केली नाही, तर आगामी काळात जनता आपल्या संतापाचा आवाज अधिक जोरकसपणे उठवेल.
प्रत्येक अपघात ही केवळ संख्या नाही, तर एखाद्या घरातील दुःखकथा आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेने आम्ही कंटाळलो आहोत.सुनीता कदम, सामाजिक कार्यकर्त्या.