Vasai Virar Plastic Ban Drive Pudhari
पालघर

Vasai Virar Plastic Ban Drive: वसईत ८८ किलो प्लास्टिक जप्तीची कारवाई

प्रभाग निहाय विविध ठिकाणी दुकाने व आस्थापनांवर तपासणी करून सदर कारवाई करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

वसई: वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत सोमवारी सर्व प्रभाग समिती कार्यालयांच्या माध्यमातून शहरातील विविध दुकाने, व्यावसायिक आस्थापना व व्यावसायिक परिसरांची तपासणी करून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती कार्यालयांतर्गत प्रतिबंधित प्लास्टिक जप्तीच्या आज करण्यात आलेल्या कार्यवाहीत एकूण ८८ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले तसेच संबंधितांवर महानगरपालिकेमार्फत दंडात्मक कारवाई करून रु.१३५००/- दंड वसूल करण्यात आला.

प्रभाग निहाय विविध ठिकाणी दुकाने व आस्थापनांवर तपासणी करून सदर कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रभाग समिती ‘ए’ बोळींज अंतर्गत १० किलो, प्रभाग समिती ‘बी’ विरार अंतर्गत ७ किलो, प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार अंतर्गत ६ किलो, प्रभाग समिती ‘डी’ आचोळे अंतर्गत १० किलो, प्रभाग समिती ‘ई’ नालासोपारा अंतर्गत १२ किलो, प्रभाग समिती ‘एफ’ पेल्हार अंतर्गत १२ किलो, प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत १० किलो, प्रभाग समिती ‘एच’ अंतर्गत १५ किलो व प्रभाग समिती ‘आय’ अंतर्गत ६ किलो असे एकूण ८८ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.

महानगरपालिकेकडून सातत्याने प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, प्लास्टिकमुक्त व स्वच्छ शहर निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. प्रतिबंधित प्लास्टिकमुळे पर्यावरण, जलस्रोत, सागरी जीवसृष्टी तसेच मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने त्याचा वापर पूर्णतः टाळणे आवश्यक आहे.

प्लास्टिक कचऱ्यामुळे नाले व गटारे तुंबून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळल्यास शिक्षाही होऊ शकते. यामुळे प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करून शहर विद्रूप करू नये व पर्यावरणास हानी पोहोचेल अशी कोणतीही गोष्ट करू नये. तसेच शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT