Dahanu Bordi Road: डहाणू-बोर्डी सागरी राज्यमार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला; ४८ तासांत युद्धपातळीवर दुरुस्ती

डहाणूसह सीमाभागातील वाहतूक पूर्ववत
Dahanu Bordi Road
Dahanu Bordi RoadPudhari
Published on
Updated on

डहाणू: मागील आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलेले डहाणू-बोर्डी प्रमुख सागरी राज्यमार्गावरील भाग अवघ्या ४८ तासांत युद्धपातळीवर दुरुस्त करून रविवारी सायंकाळी वाहतुकीसाठी रस्ता पुन्हा खुला करण्यात आला.

नरपड-आंबेवाडी व चिखले येथील तीन ठिकाणी वाहून गेलेल्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुनर्बांधणी केल्याने डहाणू शहरासह चिखले, घोलवड, बोर्डी आणि गुजरातमधील उंबरगावकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली असून नागरिक व वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Dahanu Bordi Road
Kalyan Shil Traffic Jam: कल्याण-शिळ मार्गावर वाहतूक कोंडी; ४ किलोमीटरसाठी २ तासांचा खोळंबा

सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे डहाणू-बोर्डी प्रमुख सागरी राज्यमार्गावरील नरपड-आंबेवाडी येथे ७० मीटर व ४५ मीटर लांबीचे दोन भाग, तर चिखले गावातील नवी खाडी परिसरात ४० मीटर लांबीचा एक भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्यामुळे डहाणू शहराचा चिखले, घोलवड, बोर्डी तसेच गुजरात सीमाभागाशी संपर्क तुटला होता.

अनेक गावांचा जनसंपर्क काही दिवस खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेची गंभीर दखल घेत पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

डहाणू तसेच पालघर मध्यवर्ती कार्यालयाला जोडणारा आणि महाराष्ट्र-गुजरात सीमाभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रमुख सागरी राज्यमार्ग असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात आले.

Dahanu Bordi Road
Mangaon Smart Meter Protest: माणगावात स्मार्ट वीज मीटरला तीव्र विरोध; बसविलेले मीटर काढून टाकण्याची मागणी

त्यानुसार संबंधित यंत्रणेला युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, पालघर उपविभागाचे उपअभियंता अजय जाधव, डहाणूचे नितीन पगारे आणि वसईचे संजय यादव यांनी कामाचे नियोजन केले. कंत्राटदार कुशल राऊत, केतन धानमेहेर आणि श्रेयस पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

दुरुस्तीच्या कामासाठी ३ पोकलेन, ४ जेसीबी, ४० हायवा ट्रक आणि ८ काँक्रिट मिक्सर यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री उशिरापर्यंत अखंडपणे काम सुरू ठेवत अवघ्या ४८ तासांत रस्त्यांची पुनर्बांधणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रविवारी सायंकाळी ४ वाजता हा प्रमुख सागरी राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेश उमतोल यांनी दिली.

राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्याने डहाणू, चिखले, घोलवड, बोर्डी तसेच गुजरात सीमाभागातील उंबरगावकडे होणारी वाहतूक पूर्ववत झाली असून काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आणि वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या मार्गावरील जनजीवनही पुन्हा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news