Mumbai Ahmedabad Highway Traffic: अहमदाबाद महामार्गावरील वाहतूककोंडीने वसई–विरारकर त्रस्त; दररोजचा प्रवास बनला डोकेदुखी

परिणामी वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Mumbai Ahmedabad Highway Traffic
Mumbai Ahmedabad Highway TrafficPudhari
Published on
Updated on

विरार: मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे वसई–विरार परिसरातील नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच मालवाहतूक करणारे वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत.

आठवड्याचे सर्व दिवस आणि विशेषतः शनिवार-रविवारी महामार्गावर वाहने रांग लावत असल्याने काही मिनिटांचा प्रवास तासन्‌तास लांबत आहे. परिणामी वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mumbai Ahmedabad Highway Traffic
Dahanu Bordi Road: डहाणू-बोर्डी सागरी राज्यमार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला; ४८ तासांत युद्धपातळीवर दुरुस्ती

महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांना होती. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुन्हा दुरुस्तीची वेळ आली आहे. काही भागांत रस्ता पुन्हा खोदण्यात आला असून पावसामुळे खड्डे आणि चिखल निर्माण झाल्याने वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.

याचाच परिणाम म्हणून वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. याशिवाय महामार्गावर अधूनमधून बिघाड झालेली वाहने, किरकोळ अपघात, तसेच सुरू असलेली विविध विकासकामे यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे.

सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होत असून अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना नियोजित वेळेत कामाच्या ठिकाणी किंवा घरी पोहोचणे कठीण बनले आहे.

वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका, शालेय बस, सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना बसत आहे. उद्योग-व्यवसायांवरही त्याचा परिणाम होत असून मालाची वेळेत वाहतूक होत नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान वाढत आहे. रोजच्या या समस्येमुळे अनेक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास टाळण्यास सुरुवात केली असून पर्यायी मार्गांचाही वापर वाढला आहे.

Mumbai Ahmedabad Highway Traffic
Kalyan Shil Traffic Jam: कल्याण-शिळ मार्गावर वाहतूक कोंडी; ४ किलोमीटरसाठी २ तासांचा खोळंबा

वाहतूक कोंडीमुळे इंधनाचा अतिरिक्त खर्च, वाहनांचे वाढते झिजणे आणि प्रदूषणात होणारी वाढ हीदेखील चिंतेची बाब बनली आहे. वाहनचालकांचा मोठा वेळ वाहतुकीत अडकून जात असल्याने मानसिक तणाव वाढत असून याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. सततच्या या समस्येमुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ठोस उपाययोजनांची आवश्यकता

वसई–विरार महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अपूर्ण कामे जलदगतीने पूर्ण करणे, बिघाड झालेली वाहने तात्काळ हटविण्याची व्यवस्था करणे, खड्डे बुजविणे आणि गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक कर्मचारी तैनात करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा येत्या काळात वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news