खानिवडे : पालघर जिल्ह्यातील प्रतिष्ठेची महानगरपालिका असलेल्या वसई-विरार महापालिकेचे आरक्षण जाहीर झाले असून 58 महिलांना नगरसेविका होण्याची संधी नव्या सोडतीनुसार मिळणार आहे. चार प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्याने सर्वच नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
मागील पाच वर्षे प्रशासक राजवट असलेल्या वसई-विरार महापालिकेची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. 28 जून 2020 मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूका होणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे पालिकेवर प्रशासकाचे राज्य होते.
आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पालिकेने 2025 ची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गव सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी आरक्षण सोडत विरार पश्चिम येथील महापालिकेच्या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर पार पडली. पालिकेत 29 प्रभाग असून 115 जागा आहेत. 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार याद्यांच्या आधारे प्रभागनिहाय आरक्षण निश्चित केले असून ही सोडत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली.
वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयात मा.प्र.आयुक्त तथा प्रशासक डॉ. इंदू राणी जाखड (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत पार पडला.
वसई-विरार शहर महानगरपालिकेत निवडणूकीच्या अनुषंगाने एकूण 29 प्रभाग करण्यात आले असून 28 प्रभागात प्रत्येकी 4 व 1 प्रभागात 3 या प्रमाणे एकूण 115 सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्यापैकी अनुसूचित जातींमधील आरक्षित जागांपैकी महिलांची सोडत काढणे प्रक्रीयेपासून सदर आरक्षण सोडतीस प्रारंभ झाला. यानंतर अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. सोडतीची प्रक्रिया राबविताना शालेय विद्यार्थ्यांमार्फत सर्वांसमक्ष चिठ्या काढून आरक्षण निश्चित केले.
अनुसूचित जाती (महिला) आरक्षित जागांपैकी सोडतीमध्ये प्रभाग क्र.11अ, 14अ व 19अ हे 03 प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमाती (महिला) आरक्षित जागांपैकी सोडतीमध्ये प्रभाग क्र.19ब, 25अ व 27अ हे 03 प्रभाग निश्चित करण्यात आले. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) यामध्ये 1ब, 2अ, 4अ, 6अ, 7अ, 8अ, 9अ, 12अ, 13अ, 15अ, 17अ, 20क, 21ब, 23अ, 26अ, व 29अ ह्या 16 जागा निश्चित करण्यात आल्या.
आरक्षणाचे चित्र
एकूण जागा : 115
अनुसूचित जाती : 5
अनुसूचित जमाती : 5
मागासवर्गीय (ओबीसी) : 31
सर्वसाधारण प्रवर्ग : 74
महिला आरक्षण : 58
महापालिकेच्या 115 जागांसाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. 17 ते 24 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.डॉ. इंदूराणी जाखड, प्रभारी आयुक्त महापालिका तथा जिल्हाधिकारी पालघर