Vasai-Virar Flood Solution Pudhari
पालघर

Vasai-Virar Flood Solution: वसई-विरार शहराला पुराच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

शहरातील गायब नाल्यांचा शोध घेऊन अनधिकृत बांधकामे पाडणार

पुढारी वृत्तसेवा

विरार: वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणारी पूरपरिस्थिती ही प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातील नैसर्गिक नाले आणि मोठ्या गटारांमधून पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य गतीने होत नसल्याने अवघ्या काही तासांच्या पावसात संपूर्ण शहर जलमय होते.

या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता महापालिकेने कंबर कसली असून, शहरातून प्रत्यक्षात गायब झालेल्या नैसर्गिक नाल्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. शहराचे सखोल सर्वेक्षण करून जे नाले अतिक्रमणांमुळे लुप्त झाले आहेत, त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान पालिकेने स्वीकारले आहे.

गेल्या वर्षी शहरात आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते आणि नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. दरवर्षी नालेसफाईच्या कामावर महापालिकेतर्फे कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, मात्र तरीही पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

शहरातील अनेक नैसर्गिक नाल्यांवर अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे झाल्यामुळे नाल्यांची रुंदी कमालीची घटली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडकून शहरात पाणी साचते. यावर महापौर अजीव पाटील यांनी कठोर भूमिका घेत स्पष्ट केले की, नालेसफाईच्या कामात यापुढे कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. विकास आराखड्यात नमूद असलेल्या सर्व नाल्यांचा गाळ काढून त्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

या विकास कामांसाठी महापालिकेने मोठ्या निधीची तरतूद केली असून, शहरात एकूण 223 कोटी रुपये खर्च करून नवीन गटारे बांधण्याचे नियोजन केले आहे. महासभेत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, शहरातील विविध 263 ठिकाणी नव्या गटारांची बांधकामे केली जाणार आहेत. केवळ नवीन बांधकामे करून न थांबता, अस्तित्वात असलेल्या सर्व गटारांमधील गाळ पूर्णपणे काढून त्या स्वच्छ केल्या जातील. वारंवार गटारे फुटण्याच्या आणि खराब दर्जाच्या कामाच्या तक्रारी लक्षात घेता, कामाचा दर्जा तपासण्यासाठी आणि महापालिकेच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी एका विशेष सल्लागाराची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.

सर्व मॅनहोल्स एकाच पातळीवर आणणार

शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक आधुनिक करण्यासाठी उघड्या गटारांवर संरक्षक जाळ्या बसवण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यावरील सर्व मॅनहोल्स एकाच पातळीवर आणले जातील, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. महापालिकेने हाती घेतलेल्या या 263 कामांपैकी जी कामे अत्यंत तातडीची आहेत, ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्राथमिक तत्त्वावर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेमुळे गायब झालेले नाले पुन्हा मोकळे होतील आणि वसई-विरारकरांची पुराच्या छायेतून मुक्तता होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT