

योगेश गोडे
सापाड: तिसगावाची स्वयंभू आई तिसाई देवीचा पारंपरिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला असून जत्रेनिमित्ताने गावदेवी मंदिराला हजारों दिव्यांची रोषणाईने सजवण्यात आले आहे. चार दिवस हा उत्सव पार पडणार आहे. आई तिसाई देवीच्या जत्रोत्सवा निमित्ताने पारंपरिक पालखी सोहळा आणि विविध सांकृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून देवी जत्रा उत्सव तिसगावात साजरा करण्यात आला.
चैत्र महिना सुरू झाला की महाराष्ट्राभर देवींचा पारंपरिक जत्रा उत्सव सुरू होतो. कार्ल्याच्या डोंगरावर वास्तव्य करणारी आई एकवीरा देवी असो वा गावागावांमधील भक्ताच्या संकटाला धावून जाणारी स्वयंभू माता गावदेवी असो.
भक्तजन मोठ्या भक्तिभावाने देवीचा जत्रा उत्सव साजरा करत असतात. तिसाई देवीचा पालखी सोहळा हा हनुमान जयंती निमित्त काढण्यात येतो. तिसाई देवी ही भक्ताच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी स्वयंभू माता म्हणून पंचकोशीत ओळखली जाते.
आई तिसाई मातेचा जत्रा उत्सव भाविकांच्या श्रद्धेतून साजरा होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या जत्रा उत्सवात भाविकांच्या करमणुकीसाठी आकाशी पाळणे, चकरी घोडे, खाऊची दुकाने, लहानग्यासाठी खेळणीचे साहित्य, जादूचे खेळ दाखवणारी दुकाने, मौत का कुआ, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि खेळण्याच्या साहित्यांनी गजबजून गेलेल्या तिसाई देवी मंदिर परिसराला जत्रेच रूप आले आहे.
त्याच बरोबार जत्रेत चढलेल्या उन्हाचा पाऱ्याची झळ कमी करण्यासाठी जागोजागी उभारलेली ज्युसच्या दुकानातील भक्तांची गर्दी पाहता सूर्यालाही आव्हान देणाऱ्या देवीच्या भक्तांची भक्ती पाहावयास मिळाली.
आई तिसाई पालखी सोहळा पारंपारिक पद्धतीने तिसगावातून फिरवून मंदिराभोवती फिरवण्यात आली. पालखी सोहळ्यास तिसाई मंदिर परिसरातून सुरुवात करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात, गुलालाची लाली उधळत, फटाक्यांच्या आतषबाजीत, अखंड आई भक्तीचा गजर करत, खांद्यावर पालखी आणि तल्लीन होऊन नाचणारे भक्तगण पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. आई तिसाईची पालखी संपूर्ण गावात फिरवण्यात आली. भक्तजन आपापल्या पद्धतीने पालखीचे स्वागत करून दर्शन घेत होते.
सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची नजर
या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पंचक्रोशीतून भक्तजन उपस्थित होते. आई तिसाई देवीची जत्रा उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत झाली होती. तर मंदिर परिसर आणि पालखी सोहळ्याच्या मार्गात सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याची नजर बसवण्यात आली होती.
आई तिसाई देवी जत्रा उत्सव यशस्वीरीत्या पार पाडसण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिसाई देवी ग्रामस्थमंडळ यांच्या सहकार्याने पालखी सोहळा उत्सव यावेळी पार पडला.