

दिनेश कांबळे
डोळखांब: शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गाव पाड्यांना बंद टँकरने पाणी पुरवठा करण्या संदर्भात ठेकेदाराने 65 टक्के बिलोने भरलेल्या निविदा मंजूर झाल्याने एवढ्या कमी दरात कशा पद्धतीने पाणी पुरवठा केला जाणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शहापूर तालुका दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला तालुका आहे. येथे दरवर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. याकरिता शहापूर पं. स.पाणी पुरवठा विभागाकडून करोडो रुपयांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी मिळत असते.
यावर टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी करोडो रुपयांच्या निविदा मंजूर केल्या जातात. त्या अनुषंगाने मागील वर्षी केवळ 34 टक्के बिलोने मंजूर असलेल्या टँकर निविदा यावर्षी संबंधित ठेकेदाराने चक्क 65 टक्के बिलोने मंजूर करून घेतल्याने नेमके रहस्य काय? हा प्रश्न पडला आहे.
दरवर्षी शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरवठ्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निविदा मागविल्या जातात. यासंदर्भात स्थानिक तहसील कार्यालयाचे नोटीस बोर्डवर याची माहिती प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार या तालुक्यात बंद टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी श्रीकांत वसंत जगधने, रामचंद्र कोळेकर, विजय विलासराव शिंदे, सुभाष सातारकर, विवेकानंद ट्रान्सलाईन विवेकानंद शर्मा, नासीर आब्बास शेख या ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या. यापैकी सर्व ठेकेदारांचे तुलनेत विलासराव शिंदे या ठेकेदाराने प्रति मे.टन 1 वाहन क्षमतेला कमाल प्रतिदिन भाडे 117 रु. दराने प्रति किलोमीटर 3.15 रु. ने निविदा सादर केल्या.
या 65 टक्के कमी दराने भरलेल्या निविदा ठेकेदाराला कशी परवडते? विशेषत: शासनाचा मंजूर दर 270 रु. एवढा शासन द्यायला तयार असताना आम्ही 117 रुपये मागतो हे हास्यास्पद आहे. अतितिव्र घट असलेल्या ठिकाणी 3000 ते 5000 लिटर क्षमतेने पाणी पुरवठा करायचा असून वाहनात बिघाड झाल्यास त्याचा दुरुस्ती खर्च ठेकेदारांवर असून इंधन खर्च मिळणार आहे. तर येथे इतर ठेकेदारांकडून 2 हजार रुपये भाड्याने टँकर मागवावा लागतो. निविदा मंजूर असलेल्या ठेकेदाराला मंजूर दराप्रमाणे प्रत्येक फेरी 1400 ते 1500 दराने पडणार आहे. ही विषमता कशी भरून काढणार. यामध्ये अधिकारी व ठेकेदार यांचे कौशल्य काय असणार आहे?
तारेवरची कसरत
मुख्य म्हणजे संबंधित ठेकेदाराकडून 30 टँकर पैकी 18 टँकर प्राप्त झाल्याचे पाणी पुरवठा विभागामार्फत सांगितले जात असले तरी शहापूर तालुक्यात पाणी पुरवठ्यसाठी सापगाव येथील भातसा नदी पात्र हे एकच जलस्रोत उपलब्ध आहे. त्यामुळे याठिकाणाहून पाणी पुरवठा करताना वाहनाला 40 ते 50 किमी अंतर पडणार असून दिवसातून फक्त एकच फेरा लागण्याची शक्यता असल्याने शहापूरसारख्या दरवर्षी भीषण पाणी टंचाईच्या तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करताना देखील तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जनतेच्या नशिबी पाणीटंचाई कायम
तालुक्यात भातसा, वैतरणा, मध्यवैतरणा, तानसा ही मोठी जलाशय आहेत. तसेच 2004 पासून आजपर्यंत जलजीवनसारख्या सर्व योजना मिळून चारशे पाणी योजना कागदावरच आहेत. भावली योजना केवळ बाष्पीभवनाकरिता नावाला उरली आहे. तर टँकरने प्रत्यक्षात पाणी पुरवठा होत नसल्याने जनतेच्या नशिबी पाणी टंचाई कायम असून उपाययोजना गरजेची आहे.