विरार : वसई-विरार महापालिका हद्दीत मागील एका वर्षात तब्बल सुमारे 600 आगींच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेगाने होत असलेले शहरीकरण, वाढती लोकसंख्या, औद्योगिक आणि व्यापारी वापरासाठी उभ्या राहणाऱ्या इमारती, तसेच अपुरी अग्निसुरक्षा व्यवस्था यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
महापालिकेच्या हद्दीत उंच इमारतींची संख्या झपाट्याने वाढत असताना, अनेक ठिकाणी अग्निसुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक गृहसंकुले, व्यापारी संकुले, गोदामे, कारखाने तसेच रुग्णालये व शैक्षणिक संस्थांमध्ये आवश्यक असलेल्या अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे वास्तव समोर आले आहे. काही ठिकाणी अग्निसुरक्षा साधने केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, आगीच्या घटनांनंतर महापालिका प्रशासनाकडून तपासणी, नोटिसा व आदेश दिले जात असले तरी काही महिन्यांनंतर या कारवाईचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई न झाल्याने आगींच्या घटनांमध्ये अपेक्षित घट होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वसई-विरार परिसरात अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, अनधिकृत बांधकामे, विद्युत वाहिन्यांची अस्ताव्यस्त मांडणी आणि आपत्कालीन मार्गांची अनुपलब्धता यामुळे आग लागल्यानंतर मदतकार्य करताना अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यास विलंब होऊन जीवित व वित्तहानीचा धोका अधिक वाढतो. दरम्यान, काही आगींच्या घटनांमध्ये मानवी जीवितहानीही झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये आग लागल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील अधिकारी पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वाढत्या शहरासाठी पुरेसे मनुष्यबळ, आधुनिक अग्निशमन वाहने आणि अद्ययावत उपकरणांची आवश्यकता असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नियमित व कठोर तपासणी मोहीम राबवणे, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा विकासाच्या नावाखाली वेगाने वाढणारे वसई-विरार शहर भविष्यात एखाद्या मोठ्या दुर्घटनेचे साक्षीदार ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.