Murbad Mhsa Highway: मुरबाड–म्हसा महामार्गावरील झुकलेली झाडे बनली अपघाताला आमंत्रण

महामार्ग रुंदीकरणातील चुकीच्या नियोजनामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका; कत्तलीऐवजी पर्यावरणपूरक व शाश्वत उपाययोजनांची नागरिकांकडून मागणी
Murbad Mhsa Highway
Murbad Mhsa HighwayPudhari
Published on
Updated on

मुरबाड शहर : मुरबाड ते म्हसा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या धोकादायक वृक्षांच्या कत्तलीऐवजी शाश्वत उपाययोजना राबवाव्यात, अशी ठोस मागणी आता पुढे येत आहे. बागेश्वरी वळण ते शिरवली आणि पुढे म्हसा गावापासून पाटगावच्या दिशेने असलेल्या घाट क्षेत्रात रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक मोठी झाडे अक्षरशः प्रवासी व वाहनचालकांच्या डोक्यावर झुकलेली असल्याचे भयावह चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Murbad Mhsa Highway
Nandi Bull Traditional Folk Tour: पोटासाठी गुबू गुबू; नंदीबैल गावोगावी फिरण्याचा निखळ सोहळा

या महामार्गाचे रुंदीकरण करताना संबंधित ठेकेदाराने खोदकामादरम्यान अनेक झाडांची मुळे उघडी करून ठेवली आहेत. परिणामी, नैसर्गिक आधार गमावलेली ही झाडे महामार्गाच्या दिशेने झुकली असून ती अत्यंत धोकादायक बनली आहेत. वेगवान वाहतूक, अवजड वाहने आणि घाट क्षेत्रातील वारे यामुळे ही झाडे कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, जर संबंधित प्रशासनाने रस्ते रुंदीकरणाच्या वेळीच योग्य खबरदारी घेतली असती, झाडांच्या मुळांचे संरक्षण केले असते किंवा तांत्रिक उपाययोजना केल्या असत्या, तर आज ही गंभीर परिस्थिती उद्भवली नसती. मात्र आता प्रशासनाकडून या झाडांना ‌‘धोकादायक‌’ ठरवून सरसकट तोडण्याचा मार्ग अवलंबला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Murbad Mhsa Highway
Khora Bandar Janjira Fort Tourism: खोरा बंदरातून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी तोबा गर्दी

पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की, ठेकेदारांच्या कुऱ्हाडीखाली ही झाडे घालण्याऐवजी त्यांचे यथायोग्य सबलीकरण, माती भरणे, संरक्षक भिंती, स्टील सपोर्ट किंवा इतर तांत्रिक मजबुतीकरणाचे उपाय करणे अधिक योग्य ठरेल. यामुळे निसर्ग संपत्तीचे रक्षण होईलच, शिवाय महामार्गावरील वाहतूकही सुरक्षित होऊ शकेल.

“झाडे ही समस्या नसून, चुकीचे नियोजन ही खरी समस्या आहे. उपाययोजना केल्यास हीच झाडे सावली, पर्यावरण आणि सुरक्षिततेचे वरदान ठरू शकतात,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Murbad Mhsa Highway
Pencak Silat Maharashtra Silver Medal: पिंच्याक सिलॅटमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी; पालीच्या अनुज सरनाईकसह त्रिकुटाला रौप्य पदक

वन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी संयुक्तपणे तातडीने पाहणी करून दीर्घकालीन व पर्यावरणपूरक उपाययोजना आखाव्यात, अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची नैतिक जबाबदारी कोण घेणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news