वसई: वसई विरार शहरात श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेकडून निर्बीजीकरण प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बिजीकरण झालेल्या श्वानांसाठी वसईत एक हजार श्वानांच्या क्षमतेचे निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय वसई-विरार महापालिकेने घेतला आहे.
या निवारा केंद्रासाठी साडेपाच कोटींचा खर्च केला जाणार आहे. याशिवाय श्वानांचे निर्बिजीकरण, गणना तसेच श्वानांच्या वर्तणुकीच्या अभ्यासासाठी जीपीएस ट्रॅकर असलेल्या पट्ट्याचा वापर, अशा विविध विषयांवर महासभेत चर्चा करण्यात आली.
मागील काही वर्षापासून वसई विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. नुकताच श्वानदंशामुळे रेबीज होऊन नालासोपाऱ्यात एका नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. चालू वर्षात वसई विरार शहरात जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात श्वानदंशाच्या 15 हजार घटना घडल्या आहेत.
तर श्वानांच्या उपद्रवाचा मुद्दा पालिकेच्या महासभेतही गाजला. विरोधी पक्षाने श्वांनाचा उपद्रव रोखण्यास महापालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. शहरात नवघर आणि कशिद कोपर अशा दोन ठिकाणी श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. त्या केंद्रांची क्षमता केवळ 340 इतकी आहे.
वाढत्या श्वानांचा उपद्रव लक्षात घेता जास्तीत जास्त क्षमता असलेले निवारा केंद्र उभारण्यावर महापालिकेने भर दिला आहे. याच अनुषंगाने वसई पूर्वेच्या नवघर येथील भागात 1 हजार क्षमतेचे निवारा केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी 5 कोटी 45 लाख रूपये इतक्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे.
या निवारा केंद्रात श्वांनाची देखभाल आणि वैद्यकीय उपचार करण्याची सोय केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. शहरातील भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठीचा विषय प्रशासन गांभीर्याने घेत नाही असा आरोप भाजप नगरसेवकांनी महासभेत केला आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही सर्व आकडेवारी मागितली होती. मात्र त्यांच्याकडून माहीतीच उपलब्ध करून दिली नसल्याचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी सांगितले.
पाच वर्षात केवळ 29 हजार श्वानांचे निर्बीजीकरण
श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात वसई-महापालिकेची उदासीनता समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात केवळ 29 हजार श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात महापालिकेला यश आले आहे. त्यामुळे आता तरी निर्बीजीकरणाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे
निर्बीजीकरणासाठी सामाजिक संस्थांची मदत
वसई विरार शहरात सध्या दोन केंद्रांवर श्वानांचे निर्बीजीकरण सुरू आहे. मात्र, याला अधिक गती देण्यासाठी 2026-27, 2027-28, 2028-29 या तीन वर्षासाठी नसबंदी शस्त्रक्रियेसाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या संस्थांची श्वानांचे निर्बीजीकरण, मोकाट आणि पिसाळलेल्या श्वानांवर उपचार करणे व लसीकरण यासाठी मदत घेतली जाणार आहे. तसेच येत्या तीन वर्षात निर्बीजीकरणासाठी पालिकेकडून 7 कोटी 73 लाख 28 हजार इतक्या खर्चाची तरतूद करण्यात आली
श्वानांचा वाढता उपद्रव ही शहरातील मोठी समस्या बनली आहे. श्वानप्रेमीं, नागरिक व महापालिका असे एकत्रित पणे यातून मार्ग काढण्यासाठी काय करता येईल याबाबत बैठका झाल्या आहेत. विशेषतः श्वानांचे निर्बिजीकरण अधिक वेगाने करण्यासाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. त्यांची खाद्य ठिकाणे, लसीकरण, निवारा केंद्र तयार करणे यावर ही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.- अजीव पाटील, महापौर वसई विरार महापालिका.