धीरेन नंदुभाई पटेल pudhari photo
पालघर

Palghar News: तहसीलदार कार्यालयाच्या स्वच्छतागृहात तरुणाचा मृत्यू

महसूल प्रशासनाच्या कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : वसई तहसीलदार कार्यालयाच्या स्वच्छतागृहात २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. धीरेन नंदुभाई पटेल असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासनाच्या कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेबरोबरच संबंधित तरुणाच्या शासकीय कार्यालयातील वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे, हा तरुण कार्यालयात साफसफाईचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असली, तरी त्याच्या नियुक्तीची अथवा कामकाजाची अधिकृत नोंद कार्यालयात नसल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी ही घटना उघडकीस आली. धीरेन पटेल याचा मृतदेह तहसीलदार कार्यालयाच्या स्वच्छतागृहात आढळून आल्यानंतर त्याला वसई येथील सर डी. एम. पेटिट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी त्याला दाखलपूर्व मृत घोषित केले.

या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ८०/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाला फिट्स येण्याचा त्रास होता. तसेच त्याला दारूचे व्यसन असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेतील सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मृत धीरेन पटेल याचे तहसीलदार कार्यालयातील वास्तव्य. तो महसूल विभागाचा नियमित कर्मचारी नव्हता. पोलिसांच्या माहितीनुसार, तो कार्यालयात साफसफाईचे काम करीत होता. मात्र, तहसीलदार कार्यालयातील उपलब्ध नोंदींमध्ये त्याची साफसफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती किंवा कामकाजासंदर्भातील अधिकृत नोंद आढळून आलेली नसल्याची माहिती आहे.

सुट्टीच्या दिवशी तो कार्यालयात कसा?

विशेष म्हणजे, ११ नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. अशा दिवशी तहसीलदार कार्यालयाच्या स्वच्छतागृहात तरुणाचा मृतदेह आढळल्याने कार्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुट्टीच्या दिवशी तो कार्यालयात कसा उपस्थित होता? तो किती काळापासून तेथे वास्तव्यास होता? त्याच्या वास्तव्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती का? तसेच कार्यालयाच्या चाव्या आणि प्रवेश व्यवस्थेची जबाबदारी कोणाकडे होती, याची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

मृत्यूचे कारण सध्या अस्पष्ट

या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार नसल्याची नोंद पोलिसांनी केली नसून मृत्यूचे कारण सध्या अज्ञात आहे. सहायक फौजदार विश्वास खोत पुढील तपास करीत आहेत. मात्र, पोलिसांचा मृत्यूच्या कारणासंदर्भातील तपास आणि महसूल प्रशासनाच्या कार्यालयात संबंधित तरुणाच्या वास्तव्याबाबतची प्रशासकीय चौकशी हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत. मृत्यूचे गूढ उकलण्याबरोबरच शासकीय कार्यालयात अनधिकृत वास्तव्य होते का, असल्यास त्याला जबाबदार कोण आणि कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेत नेमकी त्रुटी कुठे राहिली, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT