विरार ः वसई परिसरात कार्यरत असलेल्या काही रासायनिक कंपन्यांकडून नियमांना धाब्यावर बसवत खुले नाले व गटारांमध्ये थेट विषारी सांडपाणी सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा विपरीत परिणाम होत असून पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक रासायनिक कंपन्या सांडपाणी प्रक्रिया न करता थेट उघड्या नाल्यांत सोडत आहेत. या नाल्यांमधून वाहणारे काळपट, पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी थेट रहिवासी भागातून जात असल्याने नागरिकांना श्वसनाचे विकार, त्वचारोग तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिला यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
परिसरातील नाले साफसफाईअभावी आधीच कचऱ्याने भरलेले असताना त्यात रासायनिक मिश्रित पाणी सोडले जात असल्याने दुर्गंधी असह्य झाली आहे. हे दूषित पाणी पुढे खाडी व समुद्रात मिसळत असल्याने जलचर सृष्टीसह संपूर्ण परिसंस्थेवर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
वसई (पूर्व) मधील धामणकर नाका, रिचर्ड कंपाऊंड, वालिव, पेल्हार, वसई फाटा, तुरबे रोड, नायगाव, चिचोटी, सातिवली आदी औद्योगिक भागांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार करण्यात येत आहेत. मात्र संबंधित विभागांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
यापूर्वीही काही कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती, मात्र ती केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिल्याने प्रदूषणाचा प्रश्न आजही कायम आहे. प्रदूषण नियंत्रण यंत्रणांची निष्क्रियता आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे कंपन्यांचे धाडस वाढत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांनी तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, दोषी कंपन्यांचे परवाने रद्द करावेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी तसेच प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.