

डोंबिवली : गांजाची खरेदी आणि वाहतूक करून महाराष्ट्रात नागपूर, ठाणे, मुंबई, नाशिक, आदी शहरांत वितरण/विक्री करत असल्याचे व त्यांची आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यावेळी चौदा आरोपींच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान सात आरोपींना अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या या सातही तस्करांकडून 8 लाख 85 हजार रुपये किंमतीचा 35 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा, 50 हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वायरलेली कार असा एकूण 16 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मोहम्मद सोहेल उर्फ भुन्या मोहम्मद रफिक शेख (24, रा. नागसेन-1, संजयबाग कॉलनी, यशोधरानगर, नागपूर), फैजान इस्माईल शेख (24, रा. बड़ा ताजबाग, सिधोवध झोपडपट्टी, नागपूर), समीर अली साकीर अली (24, रा. बडा ताजबाग, उंब्रज रोड, नागपूर), आसिफ निजाम सय्यद (25, रा. विजय भवानी नगर, झोपडपट्टी, नागपूर) या चौघांनी अमली पदार्थ तस्करीचे जाळे पसरले होते.
या चौकडीची कसून चौकशी केली असता आणखी तिघांची नावे उघड झाली. त्यानुसार पथकाने भिवंडी, नागपूर आणि ओरिसा राज्यातून शाहीद अब्दुलगणी शेख (36, वर्षे, रा. पॅन्टाकॉन, चावींद्रा रोड, भिवंडी), शाहिद शेख उर्फ बाबा उर्फ चाटू युनूस शेख (36, वर्षे, रा. यशोदिप कॉलनी, महेंद्र नगर, पाचपावली, नागपूर), रविंद्र सुशांत मिर्धा (38, रा. मु. पो. डिमीरी मुंडा,ओरिसा ) अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या.
अटक केलेल्या आरोपींसह फरार आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम प्रमाणे कलमांचा अंतर्भाव करण्यासाठी पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी परवानगी दिल्याने या आरोपींचा मंगळवारी16 डिसेंबर रोजी कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून ताबा घेऊन त्यांना जिल्हा न्यायाधिश - 1 व अतिरीक्त सत्र न्यायाधिश आणि ठाण्याच्या विशेष मोक्का न्यायाधिशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या सातही आरोपींना अधिक चौकशीसाठी 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
गुप्तहेरांकडील माहितीनुसार गुरुवारी कारमधून तीन ते चार इसम गांज्याचा साठा विक्रीसाठी कल्याण पश्चिमेकडील मुरबाड रोडला येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वालधुनी पूल परिसरात जाळे पसरले. सावज टप्प्यात येताच पोलिसांनी भरधाव कारला थांबण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने कार वेगात चालवून पोलीस शिपाई सोनवणे यांच्या अंगावर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यातून सोनवणे थोडक्यात बचावले. पोलीस पथकाने थरारक पाठलाग करत कार रोखली. कारमध्ये 35 किलो 400 ग्रॅम वजनाच्या गांज्यासह एक गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले.
पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून शाहीद अब्दुलगणी शेख (36, भिवंडी), शाहिद शेख उर्फ बाबा उर्फ चाटू युनूस शेख (36, वर्षे, रा. नागपूर) आणि रविंद्र सुशांत मिर्धा (38, रा. ओरीसा राज्य) या तिघांना ताब्यात घेतले. या त्रिकुटांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या त्रिकुटाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद सोहेल उर्फ भुन्या मोहम्मद रफिक शेख (24), फैजान इस्माईल शेख (24), समीर अली साकीर अली (24) आणि आसिफ निजाम सय्यद (25) या नागपूरमधील आणखी चार गांजा तस्करांना अटक केली.
चाळीसहून अधिक गुन्ह्यांची मालिका
सखोल चौकशी केली असता या टोळीच्या विरोधात नागपूर शहर आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतून अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच फरार आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी संघटीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही टोळी ओरिसा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची खरेदी आणि वाहतूक करून महाराष्ट्रात नागपूर, ठाणे, मुंबई, नाशिक, आदी शहरांत वितरण/विक्री करत असल्याचे व त्यांची आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अटक केलेल्या आणि हव्या असलेल्या चौदाही आरोपींच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून केली पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. कल्याणजी घेटे करत आहेत.