murder case Pudhari
पालघर

Vasai Minor Nephew Murder Case: वसईत आत्याची निर्घृण हत्या; पुतण्या आणि मित्र ताब्यात, परिसर हादरला

वसईत आत्याची निर्घृण हत्या; पुतण्या आणि मित्र ताब्यात, परिसर हादरला

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अल्पवयीन पुतण्याने मित्राच्या मदतीने आत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईत उघडकीस आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मयत महिला दुर्गा बनसोडे (65) या वसई पश्चिमेतील बऱ्हामपुर गावातील भिमाई बंगल्यात एकट्याच राहत होत्या. त्यांची विवाहित मुलगी बोईसर येथे तर मुलगा वालीव येथे राहत असल्याने त्या एकट्याच वास्तव्यास होत्या. दिवसभरात त्यांच्याशी कुणाचा संपर्क न आल्यामुळे घटना कुणाच्या लक्षात आली नाही. मात्र सोमवारी सकाळी त्यांच्या बंगल्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीत बनसोडे यांचा 15 वर्षीय पुतण्या अधूनमधून भेटायला येत असल्याचे समोर आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पुतण्या नेहमीप्रमाणे आत्याला भेटायला आला होता. क्षुल्लक कारणावरून आत्याने त्याला ओरडले. यामुळे संतापलेल्या पुतण्याने आपल्या मित्राला बोलावले. आत्या बेसावध असताना पुतण्याने मागून तिच्या डोक्यावर बांबूने वार केला. गंभीर दुखापतीमुळे बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर दोघांनी मृतदेह बेडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य न झाल्याने दोघे तेथून फरार झाले.

दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आरोपी पुतण्याने शिक्षण अर्धवट सोडले असून, तीन महिन्यांपूर्वी त्याने आत्याच्या घरात चोरी केल्याचेही समोर आले आहे. त्या घटनेनंतर दुर्गा बनसोडे यांनी घरातील दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून, पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहेत.

“ही अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे. समाजात वाढत चाललेल्या अल्पवयीन गुन्हेगारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा घटना रोखण्यासाठी पालक, समाज आणि प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

किशोरवयीन गुन्हेगार जन्मतः तयार होत नाहीत.ते आपल्या दुर्लक्षातून संवादाच्या अभावातून आणि व्यसनाच्या सहज उपलब्धतेतून तयार होतात. आज जर आपण मुलांच्या वेदना ऐकल्या नाहीत,तर उदया समाज त्यांच्या चुका भोगेल. व्यसनावर नियंत्रण ही केवळ कुटुंबाची नाही,तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
डॉ.सुरेश पाटील, मनोविकार व व्यसनमुक्ती तज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT