Palghar Environmental Crime
खानिवडे : वसईतील उमेळे, बाफाणे, शारजामोरी या ठिकाणी तिवरांची झाडे नष्ट करून पर्यावरणाला नुकसान पोहोचवल्या प्रकरणी माणिकपूर व नायगांव पोलीस ठाण्यात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमेळे सर्वे क्रमांक १२९ या खाजगी जमिनीवरील कांदळवन नष्ट केल्या प्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य प्रकरणात मौजे शारजामोरी, बाफाणे येथील कांदळवन डेब्रिज टाकून नष्ट करण्यात आले आहे. सदर प्रकरणी ५४ जणांवर नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी कांदळवने नष्ट झाली आहेत, त्या जमीन मालकांवर गुन्हे दाखल करून पुढील प्रक्रियेत सदरची कांदळवने पुर्नजीवित करणे ही वसई कांदळवन संरक्षण समितीची जबाबदारी आहे. वसईतील कांदळवने वाचावीत त्यांच जतन, संवर्धन व्हावं यासाठी आयुक्त कोकण विभाग यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये कांदळवन संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी वसई यांनी वसईतील विविध शासकीय विभागांना एकत्रित करून पथके नेमली होती.
मात्र सदरची पथके अजूनही कागदावरच असल्याची माहिती उघड होत आहे. सदर बाबत उपविभागीय अधिकारी तथा कांदळवन संवर्धन समितीचे अध्यक्ष शेखर घाडगे यांना विचारणा केली असता, कांदळवन नष्ट केल्याप्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गृहप्रकल्प प्रकरणीही गुन्हे दाखल करण्यात येतील.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वसई तालुक्यात एकूण १४ हेक्टर कांदळवन क्षेत्र आहे. त्यातील मागील काही वर्षांमध्ये कांदळवने सर्रास नष्ट करण्यात आलेली आहेत परंतु, त्यांची आकडेवारी शासकीय दरबारी उपलब्ध नाही. भूमाफियां विरोधात केवळ गुन्हे दाखल करून या समस्येचे निराकरण होणार नाही. शासनाने कांदळवने संवर्धन करण्यासाठी सदर ठिकाणी सीसीटीव्ही ची तरतूद करण्याचे आदेश काढले होते. त्याची अंमलबजावणी वसईत झालेली नाही. मंडळ अधिकारी, तलाठी यांना दैनंदिन भेटी पाहणी करून कांदळवनाचे रक्षण करणे बंधनकारक आहे.