नालासोपारा: वसईच्या माणिकपूर येथे इंस्टाग्राम वरील मैत्री महागात पडले असून याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बलात्का-रासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील ओळखी आणि मैत्री अनेकदा धोकादायक ठरू शकतात, याचे आणखी एक उदाहरण वसईच्या माणिकपूर येथे समोर आले आहे.
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीचा गैरफायदा घेत एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२३ ते १८ जून २०२६ या कालावधीत २६ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्राम वरून ओळख झालेल्या १८ वर्षीय मुलीला भेटण्यासाठी घरी बोलावले.
त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. याचवेळी आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह छायाचित्रे काढून ठेवली. त्यानंतर आरोपीने विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिचे फोटो सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच तिचा जीव घेण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी तरुण-तरुणींना सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये. वैयक्तिक माहिती, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी किंवा ब्लॅकमेलिंग झाल्यास तातडीने पालक व पोलिसांशी संपर्क साधावा आदी आवाहन केले आहे.