नालासोपारा : ‘मी महादेवाचा अवतार आहे,’ असे सांगून एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाप्रकरणी वसईतील स्वयंघोषित धर्मगुरुच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हृषीकेश वैद्य (40) असे या धर्मगुरूचे नाव असून एका 35 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणी हृषीकेश वैद्य फरार असून त्याच्या शोधासाठी 4 पोलीस पथके रवाना झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी आरोपीने फिर्यादी महिलेला आपण महादेवाचा अवतार असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने तिला पुणे येथील मांजरी परिसरातील रिक्षा स्टॅन्डजवळील एका लॉजमध्ये नेले. तेथे प्रसाद असल्याचे सांगून प्रसादामध्ये गुंगीकारक औषध दिले व महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचा आरोप आहे. या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलावले. दिनांक 11 मे 2025 रोजी आरोपीने पुन्हा फिर्यादी महिलेला भेटण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. जर भेटली नाही तर आक्षेपार्ह फोटो तिच्या पतीला पाठवण्याची धमकी दिली. यानंतर वसई पश्चिम येथील एका नामांकित हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. यावेळी घडलेली घटना कोणाला सांगितल्यास फिर्यादीच्या पतीला गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या गंभीर प्रकारानंतर फिर्यादी महिलेने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी हृषीकेश वैद्य याच्याविरोधात गुन्हा नोंद केला.
याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे म्हणाले की,“ या प्रकरणात पीडित महिलेची तक्रार आली आहे. हा महाराज पीडित महिलेच्या सोशल मीडियामार्फत संपर्कात आला होता. या महाराजाने पुण्यातील मांजरीत महिलेवर अत्याचार केला. तसेच पीडित महिलेवर ब्लॅकमेल करून संपर्कात राहिला. पुन्हा वसईतदेखील या महिलेवर अत्याचार केला. पीडित महिलेला या सगळ्या प्रकाराची जाणीव झाल्यानंतर महिलेने वसईमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा पुण्यातील मांजरी पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे”.या महाराजाला शोधण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. तसेच आरोपीचा बाहेरच्या जिल्ह्यात शोध घेत आहेत. कोणी चुकीचे करत असेल अशा पद्धतीने कोणासोबत काही झाले असेल तर पोलिसांशी संपर्क करावा.
हृषीकेश वैद्य हा वसई परिसरातील एक स्वयंघोषित धर्मगुरू आणि ‘आमची वसई’ नावाच्या संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष आहे. तो वसई (पश्चिम) येथील स्टेला परिसरात असलेल्या ‘ॐ राधा कृष्णा’ इमारतीमध्ये तळमजल्यावर आपल्या कुटुंबासह राहतो. हृषीकेश वैद्य हा ‘आमची वसई’ या संस्थेच्या माध्यमातून वसई-विरार पट्ट्यात सक्रिय होता. या संस्थेच्या नावाने तो सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करायचा. वसई किल्ल्यातील दीपोत्सव, शहरातील विविध धार्मिक उत्सव आणि आध्यात्मिक प्रवचने त्याने केली होती. याच माध्यमातून त्याने पीडित महिलेशी ओळख वाढवून तिला अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढले. यानतंर तिची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे