.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नरेश कदम
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभेतील 9 खासदारांपैकी 6 खासदार हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे ‘ऑपरेशन’ घडवून अंतिम टप्प्यात आणले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देण्याचे ठरले होते. परंतु, उद्धव ठाकरे यांच्याशी या खासदारांची बैठक झाल्यामुळे हे ‘ऑपरेशन’ तूर्तास स्थगित झाले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
ठाकरे गटाचे लोकसभेतील 9 खासदारांपैकी 6 खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची कुणकुण त्यांच्याच मुंबईतील दोन ‘खास’ खासदारांना लागली. त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले.
‘मातोश्री’वर खासदारांनी मांडल्या व्यथा
‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांनी या खासदारांची बैठक घेतली. त्यात, या खासदारांनी, आम्हाला आपल्याकडून वेळ दिला जात नाही. सत्तारूढ खासदारांना सरकारकडून मतदारसंघातील कामांसाठी अतिरिक्त निधी दिला जात आहे. समोर सत्तारूढ तीन पक्ष आहेत. सत्ता आणि पैशाचा वापर करून निवडणुका जिंकल्या जात आहेत. त्यापुढे आमचा निभाव लागणार नाही. तसेच, मुंबईतून कोणी नेते ग्रामीण भागात प्रचाराला आले नाहीत, असे सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालानंतर या मोहिमेला वेग आला आहे. यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला. दिल्लीतील शिंदे यांच्या बंगल्यावर ठाकरे गटाच्या खासदारांच्या सुरुवातीला ‘वन टू वन’, तर नंतर एकत्र बैठका झाल्या आहेत. यात या खासदारांचे ‘ब्रेन वॉश’ करण्यात आले. मुंबईतील अरविंद सावंत आणि अनिल देसाई या ठाकरे यांच्या निकटवर्तीय खासदारांशी शिंदे यांच्याकडून संपर्क साधला होता. त्यामुळे ही खासदारांमधील हालचालीची माहिती त्यांना मिळाली. ती उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली.
मंत्रिपदासह पद घेण्याचा ‘फॉर्म्युला’ही तयार
ठाकरे गट नक्की कोणत्या पक्षासोबत आहे, हे स्पष्ट नाही. काँग्रेससोबत जाण्याचीही स्पष्ट भूमिका नाही. निधी मिळणार नाही, अशा अनेक गोष्टी त्या खासदारांना सांगितल्या गेल्या. सुरुवातीला तीन खासदारांची संख्या आता सहावर गेली आहे. आवश्यक असणारी संख्या झाली होती. मार्चच्या अखेरीस या ‘ऑपरेशन’ची घोषणा होणार होती. त्यासाठी परवानगी घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलीकडेच भेट घेतली होती. सहापैकी दोघांना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देण्यात येणार होते. तर, अन्य खासदारांसाठी काही पदे ठरली होती.